बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते एकमेकांविरोधात आक्रमक होताना दिसत आहे.गोपीनाथ गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी परळीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाऊबिजेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.भाजपने 5 वर्ष सत्ता भोगली मात्र, भाजपला या पाच वर्षात पाहिजे तशी विकासकामे करता आली नाहीत, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.
भाजप पाच वर्ष सत्तेत होती मात्र परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम त्यांना करता आले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.भाजपला परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम पाच वर्षात करता आले नाही. मात्र आम्ही हे काम दीड वर्षात पुर्ण केलं. त्यामुळे ते काम विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचे सांगत याच कारणामुळे विरोधक उलटसुलट आरोप करत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.आपल्या मातीतल्या माणसांची काळजी लागते, असा टोला देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
आपण मतदारसंघात विकासाची कामे केलीत त्यामुळेच मला 24 तासापैकी 2 तास उचक्या लागतात. एवढं माझं नाव घेतलं जातंय. सध्या मी मोठ्या टीकेचा धनी झालो आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.दिवसातून 4 तास उचक्या लागल्या तरी मी घाबरणार नाही. मी ध्येय वेडा माणूस आहे. परळीत मोठ मोठे उद्योग आणले पाहिजेत, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहेत.
परळीकडे असंख्य लोकांच्या वाटा वळवल्या पाहिजेत, अशी परळी निर्माण करण्याचं माझं स्वप्न पाहिल्याचं देखील धनंजय मुंडेंनी यावेळी बोलून दाखवले. मी परळीचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा, असेही आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, काहीजण माझ्याकडे दोन वर्षाचा हिशोब मागत आहे, मी त्यांना हिशोब देणारच आहे, असे म्हणत त्यांनी मुंडे भगिनींना देखील टोला लगावला आहे