“कार्यकर्ते” कवी साहेबराव ठाणगे यांचे विडंबन काव्य !
फ्लेक्सवरती पन्नास मुंडकी
बिन मेंदूची नुसती खोकी,
शुभेच्छुकांच्या जत्रेमधली…
भरकटलेली भाकड डोकी.
पंचायत झाली, झेडपी आली
इलेक्शनचा नाही तोटा,
एकाच घरात पाचपाच पक्ष..
लोकशाहीचा कारभार मोठा.
म्हातारीकोतारी राबती रानात
तरणे हिंडती गावगन्ना,
नेत्यासाठी काय पण दादा…
तुम्ही फकस्त ‘ व्हय ‘ म्हणा.
सतरंज्या उचलू खुर्च्या मांडू
तोंड फाटेस्तोवर घोषणा देऊ
रातच्याला मस्त धाब्यावरती
क्वार्टर मारून कोंबडी खाऊ
आदेश आला ‘ कामाला लागा ‘
‘ त्यां ‘च्याच घरात तिकीट गेले
हयातभर राबराब राबून
कार्यकर्ते फुकटच मेले.
▪️कवी साहेबराव ठाणगे