Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरे नव्या घरी ‘शिफ्ट’ ! घराच्या नावावरून रंगली चर्चा !

मुंबईः मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यात बदल झाला आहे. राज ठाकरे आता कृष्णकुंज या इमारतीत नाही तर स्वतःच्या मालकीच्या शिवतीर्थ या पाच मजली इमारतीत राहणार आहेत. या इमारतीत पहिल्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम आहे. या ठिकाणी मनसेच्या बैठकांची व्यवस्था आहे. मनसेचे मुख्यालय आता शिवतीर्थ या इमारतीत असेल. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर आधुनिक खासगी वाचनालय तसेच राज ठाकरे यांचे घर आहे. या व्यवस्थेमुळे राज ठाकरे यांना भेटणे मनसेच्या कार्यकर्त्यांना सोयीचे होईल.
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी पूजन केल्यानंतर घराच्या नावाच्या पाटीवरील भगव्या रंगाचा पडदा दूर केला. नव्या घराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या या घराची चर्चा सोयीसुविधांसाठी नाही तर नावाच्या पाटीवरुन आहे.
शिवाजी पार्क मैदानात जिथे शिवसेनेची सभा असते त्या ठिकाणाला शिवसेना शिवतीर्थ म्हणते. प्रत्यक्षात ती जागा म्हणजे शिवाजी पार्क मैदानाचा एक भाग आहे. शिवसेनेने शिवतीर्थ या नावाने कोणत्याही जागेची नोंदणी केलेली नाही. पण राज ठाकरे यांनी घराचे नावच शिवतीर्थ असे ठेवले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन घराची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे या नावाला हरकत घेणे शिवसेनेसाठी अशक्य आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे घर शिवाजी पार्क परिसरातच आहे.
राज ठाकरे आधी कृष्णकुंज इमारतीत राहात होते. ही इमारत शिवाजी पार्क परिसरात आहे. तसेच राज ठाकरे यांचे नवे घर असलेली शिवतीर्थ ही पाच मजल्यांची खासगी इमारत कृष्णकुंज इमारतीच्या जवळ दादरच्या शिवाजी पार्क परिसरातच आहे. यामुळे शिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थ अशा नावाची एक जागा राज ठाकरे यांची आहे. याच एका कारणामुळे शिवसेनेची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा आहे.