Take a fresh look at your lifestyle.

रोज नव्याने भेटा स्वतःला.

पहिली स्वतःची ओळख व्हायला हवी.

माझ्या प्रिय मित्रहो
आपण स्वतःला आरशात दररोज पहातो.पण स्वतःच स्वतःला पहात असताना काही वेगळं निरीक्षण आहे तुमच्याकडे?
खरंतर असं कोणतही निरिक्षण घडतच नाही.आणि जरी केलं तरी ती बाह्यांगाची निरीक्षणं. तारुण्यात डोक्यावरील काळ्या केसांचं आणि वयपरत्वे पिकलेल्या केसांचं आणि चेहऱ्यावरील सुरुकुत्या.कोमल त्वचा नाहीसी होऊन चंद्रविवरं तयार झालेली.
चला..आता त्याला काही विलाज नाही. असं म्हणून नित्यकर्माकडे वाटचाल.

सेल्फीचा नाद अनेकांना लागला आहे. पहिल्या सेल्फित आपणच आपल्याला आवडत नाही हे सत्य आहे ना?
मग पाचदहा झाल्यावर एखादा आवडतो.
त्यातही तो हसरा हवा असं वाटणारांना नेमकं कसं हसावं हेच कळत नाही. कारण ते कारणाशिवाय हसणं असतं. कारणीक सुध्दा हसणं संपत चाललय.
आपला चेहरा आपल्या कर्माचं प्रतिनिधित्व करतो.
अनेकदा वयस्कर मंडळी म्हणतात,”हे डोक्यावरचे केस काय असेच पांढरे झाले नाहीत,जग अनुभवलय मी.”
मी आज फार महत्त्वाचं भाष्य करतोय.जे या प्रक्रियेत असतील त्यांना हे लगेच कळेल.आपण कितीही ठरवलं तरी समाजजीवन जगणारा मनुष्य स्वतः स्वतःला प्रसन्न ठेऊ शकत नाही. त्याची प्रसन्नता इतरांवर अवलंबून आहे.तसं नसतं तर गर्भश्रीमंत माणसं समाजाशिवाय जगली असती.

आपलं सुखं दुसऱ्यानं पाहिल्याशिवाय प्राप्त होणार नाही ही रचना भगवंताचं अस्तित्व मान्य करायला लावणारी आहे.
अर्धा तोळा जरी अंगावर घातला तरी कुणीतरी त्याला पहावंच त्याशिवाय त्याचा आनंद घेताच येत नाही.
आरशासमोर उभं रहायचं कारणही असंच आहे. मी कसा दिसतो हे नाहीचं.
मी समाजात कसा दिसतो हे आहे.
म्हणून तर केस काळे करावे लागतात, पडलेले दात नविन बसवावे लागतात.
आम्हाला चिंता आहे, मी कसा दिसेल?
हे मान्यच करावं लागेल की माझ्या अस्तित्वाला समाजच कारणीभूत आहे. आणि म्हणूनच त्याला किंमत आहे. त्यांच्या बऱ्यावाईट म्हणण्यानं माझं अस्तित्व हिन होतं किंवा ते विशेष होतं.कारण आपल्या कर्मानुसार ते आरशाचं प्रतिक आहे.

“मी स्वतःला आज प्रसन्न ठेवील. सेल्फितलं हास्य दिवसभर चेहऱ्यावर ठेवील.”असं “वचन” स्वतःला देऊन तर पहा.
काहींना आपण प्रपंचात किती रापलोय,खळखळून हसू सुध्दा शकत नाही याचा शोध लागेल.
स्वतःला चांगल्या गोष्टींजवळ घेऊन जाता आलं की स्वतःलाच नव्याने भेटल्याचा आनंद होईल.
जीवन अनमोल आहे. ते आनंदानच जगता आलं पाहिजे. मात्र ते अनुभवण्यासाठी फाजील तत्व आणि तत्त्वज्ञान बासनात गुंडाळून ठेवायची तयारी हवी.
जय जय राम कृष्ण हरी🙏