Take a fresh look at your lifestyle.

कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता ?

जाणून घ्या, नेमके काय आहे कारण ?

मुंबई : पेट्रोल-डिझेलबरोबरच आता कांदाही स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचे बोलले जातं आहे.
याबाबत केंद्र सरकारने म्हटले की, आतापर्यंत देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून 1.11 लाख टन कांदा बाहेर काढला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात 5 ते 12 रुपये किलोने भाव उतरले आहेत. हा बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला होता. याव्यतिरिक्त महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या स्थानिक बाजारांमध्ये कांदा पाठवण्यात आला होता.
प्रशासनानं जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले की, “बफर स्टॉकमार्फत कांद्याच्या किमती स्थिर करण्यात येत आहेत. कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे आता परिणाम समोर आले आहेत.” कांद्याच्या किमती आता गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त आहेत. कारण या प्रमुख भाजीची सरासरी अखिल भारतीय किरकोळ किंमत 40.13 रुपये प्रति किलो आहे, तर घाऊक बाजारात 31.15 रुपये प्रतिकिलो आहे.
दि. 2 नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधून एकूण 1,11,376.17 टन कांदा प्रमुख बाजारपेठेत आणण्यात आला होता. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत किरकोळ किमती 5-12 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत.
दिल्लीत किरकोळ कांद्याचे दर 3 नोव्हेंबरला 44 रुपये प्रति किलोवर आले आहेत, जे 20 ऑक्टोबरला 49 रुपयांवर होते. मुंबईत 14 ऑक्टोबरला कांद्याचे दर 50 रुपये किलोवरून आता 45 रुपयांवर आले आहेत.