Take a fresh look at your lifestyle.

अखेर कार्तिकी वारीचा मार्ग मोकळा !

राज्य सरकारने दिला हिरवा कंदिल.

 

सोलापुर :राज्यातील भोळ्या भाबडया वारकऱ्यांना अनेक दिवसांची ओढ लागून होती ती युगे अठ्ठावीस विटेवर उभे असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची ! ही प्रतिक्षा अखेर संपली असून अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी चालत कार्तिकी वारीला जाण्याची परवानगी मिळाली आहे.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान या वारीला मोठी गर्दी होणार हे अपेक्षित असल्याने जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे कार्तिकी वारीसाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केल्याने वारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
17 एप्रिल 2020 पासून वारकऱ्यांना एकाही वारीला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती मात्र आता आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी जाण्याची संधी मिळणार असल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या चार वारींच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. मात्र मागील काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पायी वारी सोबत चालत जाण्यासाठी सरकारने बंधने घातली होती.तसेच कोरोनाच्या दोन लाटांमध्ये आषाढी वारीला मानाच्या पालख्या एसटी बसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी ठराविक वारकरीच वारीत सहभागी झाले होते.