Take a fresh look at your lifestyle.

देव पावला ! महाराज मंडळींना आता मिळणार ‘ एवढे’ मानधन !

ठाकरे सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय.

 

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत सापडलेल्या राज्यातील 48 हजार कलावंतांना महिना पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता यात सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने वारकरी संप्रदायाचाही समावेश केला असून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही आता पाच हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला.

राज्यभरातील धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम कोरोनामुळे बंद आहेत. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे विठ्ठल पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याच्या मागणीबरोबरच मागणी केली होती.इतरही प्रमुख मागण्या केल्या होत्या. यामुळे लवकरच आता राज्यातील महाराज मंडळींना दिलासा मिळणार असल्याचे विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये काल वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली. कित्येक जणांना प्राण गमवावे लागले. सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसी देण्याचाही कार्यक्रम सुरू केला. सर्व ठिकाणी अटकाव घालण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. मात्र लोकांनीही शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहेत. अशात अनेकांना कोरोना संकटाने घेरल्याने आयुष्य अंधारात गेले आहेत.

श्रावण महिना संपला आहे आणि सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण काही दिवसांवर आले आहेत. अशा वेळेस गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता जमावबंदीसारखे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसेच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिले आहेत.