Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना आणखी एका राज्यात निवडणूक लढवणार !

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा.

मुंबई : दादरा नगर-हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्याने शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर खाते उघडले आहे.त्यामुळे सेनेचा आत्मविश्वास वाढल्याने आता शिवसेना आणखी एका राज्यात निवडणूक लढणार असल्याची घोषणा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली.
दादरा नगर-हवेलीत झालेला विजय हा जनतेचा विजय आहे. शिवसेनेने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा खासदार निवडून आला. महाराष्ट्राबाहेरही मिळालेल्या यशानंतर आत्मविश्वास वाढल्याने शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी तयार झाली आहे.
दादरा नगर-हवेलीत शिवसेनेचा मोठा विजय झालाय. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, असेही मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, गोव्यासह आणखी एका राज्यात शिवसेना निवडणूक लढणार आहे. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले. त्यांनी केलेल्या कामांची दखल जनतेने घेतली आहे, असेही आदित्य ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.