Take a fresh look at your lifestyle.

घरच्या घरी उटणं बनवा; हे प्रकार नक्की ट्राय करा!

 

दिवाळीत भल्या पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची आपली परंपरा आहे. पूर्वी लोक घरीच उटणे तयार करत. मात्र हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अनेकदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश असतो. चला, तर आज आपण घरच्या घरी उटणे कसे बनवायचे? त्याबाबत माहिती पाहूयात…

1. ​हळद- तिळ : सर्वप्रथम मिक्सरच्या भाड्यांमध्ये ​हळद आणि तिळ एकत्र घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करा. उटणे तयार झाल्यानंतर चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर अंग धुऊन घ्या. या उटण्यामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार होण्यास मदत मिळते.
2. हळद, तिळाचे तेल आणि चंदन : सर्वप्रथम वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर, दोन ते तीन चमचे तिळाचे तेल घ्या आणि बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. तुमचे घरगुती उटणे तयार आहे.

3. हळद, चंदन, तांदळाचे पीठ, बेसन, गुलाब पाणी : सर्वप्रथम अर्धा मोठा चमचा तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र करा. त्यामध्ये गुलाब पाणी, चंदन पावडर आणि तिळाच्या तेलाचे एक ते दोन थेंब मिक्स करा. सर्व सामग्री एकजीव करा. चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर उटणे लावून अभ्यंगस्नान करा.
4. हळद, चंदन, तांदळाचे पीठ, गुलाब पाणी व दुधाची मलई : सर्वप्रथम एका वाटीमध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी व दुधाची मलई मिक्स करा. सर्व सामग्री मिक्स करून उटणे तयार करा आणि शरीरावर लावा. यातील नैसर्गिक सामग्रींमुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

काय काळजी घ्याल? : काही लोकांची त्वचा संवेदनशील असल्याने नैसर्गिक सामग्री असूनही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून नेहमी पॅच टेस्ट करून पहा. त्वचेसाठी नैसर्गिक किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या हाताच्या त्वचेवर पेस्ट किंवा लेप लावून पहा. त्वचेवर जळजळ किंवा खाज येणे, त्वचा लाल होणे यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास उपाय करणं टाळा.