Take a fresh look at your lifestyle.

दिवाळी आणि फटाके यांची प्रथा नक्की कधी सुरु झाली? वाचा! 

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर फराळ, फटाके यांचे एक अतूट नाते आहे. मात्र दिवाळीत फटाके उडविण्याची प्रथा आली कोठून? याबाबत आज जाणून घेवूयात… 
एका माहितीनुसार, साधारणतः २२०० वर्षापूर्वी चीनच्या लुईयांग भागात फटाके उडविल्याचे पुरावे सापडले आहेतत. चीनमध्ये प्राचीन काळापासून भुत, आत्माप्रेते यांच्या सावटापासून सुटका मिळावी म्हणून आवाजाचे फटाके उडविण्याची प्रथा आहे. या आवाजाला घाबरून भुते पळून जातात असा समज तेथे आहे. सुरवातीच्या काळात बांबूच्या छड्या आगीत टाकल्या जात. बांबूच्या गाठी आगीत जाळल्या कि, त्यातून मोठा आवाज येत.

प्रत्यक्ष फटाके किंवा तिची दारू याचा शोध अचानकच लागला. त्याचे झाले असे कि, काही चीनी सैनिकांनी एका डोंगरावरून आणलेली पिवळी माती एका बगीच्यात टाकली. त्या ठिकाणी अगोदरच कोळसे होते. कडक उन्हात तापल्यावर या मातीचा जोरदार स्फोट झाला. कारण माती म्हणजे सल्फर होते आणि सल्फर कोळसा संयोगातून स्फोटक तयार झाले. पुढे चीनमध्ये पोकळ बांबूमध्ये हे मिश्रण भरून पहिला हँडमेड फटाका बनविला गेला. नंतर त्यासाठी बांबू ऐवजी कागद वापरला गेला.
असे असले तरी युरोपने फटाक्यातील दारूचा फॉर्म्युला सर्वप्रथम रॉजर बेकन या रसायनतज्ञाने बनविल्याचा दावा केला होता. १३ ते १५ व्या शतकात चीन युरोप आणि अरब देशात फटाक्यांची आतषबाजी केल्याचे उल्लेख आहेत. अमेरिकेत पहिल्या स्वातंत्रदिनी आतषबाजी केली गेली होती. भारतात आठव्या शतकात वैशंपायन नीती प्रकाशिकामध्ये पुडी नावाने फटाक्याचा उल्लेख सापडतो.
विजयनगर साम्राज्यात अब्दुल रझ्झाक या राजदूताने १४४३ मध्ये महानवमी उत्सवाचे वर्णन केले आहे. त्यात फटाके आणि आतषबाजीचा उल्लेख आहे. १५१८ मध्ये गुजरातमध्ये एका ब्राह्मण कुटुंबातील विवाहात फटाके आतषबाजीचे वर्णन केले गेले आहे. १७ व्या शतकात दिल्ली आग्रा येथे आलेल्या फ्रेंच प्रवासी बर्नियारने करमणूक आणि मनोरंजनासाठी आतषबाजी केल्याचे वर्णन आहे.१८२० मध्ये बडोदा महाराजानी विवाह समारंभात फटाके आणि आतषबाजी केल्याची इतिहासात नोंद आहे. विजापूर सुलतान आदिलशाहने आपल्या मुलीच्या लग्नात ८० हजार रुपयांची फटाके आतषबाजी केल्याचा उल्लेख आहे.
एकंदरीत विचार करता, दिवाळीत फटाके उडविण्याची सुरुवात नक्की कधी झाली? याचे स्पष्ट पुरावे नाही. मात्र महादजी शिंदे यांनी पेशवे सवाई माधवराव यांना लिहिलेल्या पत्रात आतषबाजीचे वर्णन आहे. १९२३ मध्ये अय्या नादर आणि शन्मुगा नादर कोलकाता येथे काडेपेटी कारखान्यात काम करत. १९४० मध्ये स्फोटके कायद्यात सुधारणा झाल्यावर त्यांनी शिवकाशी येथे पहिला फटाका कारखाना सुरु केला. आजच विचार केला तर देशातील ८० टक्के फटाके शिवकाशी येथेच बनतात. त्यातून जवळपास १० लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो.