Take a fresh look at your lifestyle.

आपण दिवाळी कशी साजरी करणार?

दिपावली सण कशासाठी ?

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव.अंधारावर प्रकाशानेच मात करता येते.दिव्याची पेटती ज्योत हे नवचैतन्याचे प्रतीक आहे. म्हणून कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याचा आरंभ दिप प्रज्वलन करुन केला जातो.लहानपणापासूनच आमच्या मनावर शास्राने दिव्याने महत्व कोरले आहे.हा बालसंस्कार आम्हाला नित्यनव्या उर्जेची प्रेरणा देत आला आहे.
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तुते ॥१॥
दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥२॥
दिव्या दिव्या दीपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥३॥
तिळाचे तेल कापसाची वात ।
दिवा तेवु दे सारी रात ।
दिवा लागला तुळशीपाशी ।
उजेड पडला विष्णूपाशी ।
माझा नमस्कार देवाधिदेवा तुमच्या चरणांपाशी ॥४॥
ही हिंदुधर्म शिकवण जगणं समर्थ करते.शत्रुबुद्धिचा विनाश म्हणजे पापरुपी अंधारातुन पुण्यरुपी प्रकाशाकडे वाटचाल.आपण दिवाळी कोणत्या अर्थाने साजरा करतो याला अनन्यसाधारण महत्व आहे.फटाके फोडणे,दिव्यांची रोषणाई करणे,गोडधोड करणे,नववस्र परिधान करणं हे अवांतर प्रयोजन आहे.आपण अनेकदा अवांतरातच अडकतो.मुख्य प्रयोजन लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक क्षण लयाकडे जात असला तरी ठराविक मर्यादेपर्यंत नवे क्षण येत रहाणार आहेत.त्या क्षणांचा उपयोग आम्ही ज्ञान मिळवण्यासाठी केला पाहिजे.
संताची दिवाळी ज्ञानमय प्रकाशाची आहे. माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी।फेडूनि विवेकदीप उजळी।

तैं योगिया पाहें दिवाळी।निरंतर।।

मी विवेकदिपाला आलेली अविचारांची काजळी झाडुन तो प्रज्वलित करतो,त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळीचा दिवस उगवतो. ही भगवत्ज्ञानाची जादु आहे.सत ज्ञानाच्या प्राप्तीने अविचारांची काजळी दुर होते. मनातील अविवेक,अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते.
सज्जनहो आम्ही दिवाळी साजरी करण्यामागचं मुख्य प्रयोजनच हे आहे.
तुकोबाराय म्हणतात,साधू संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।।
अज्ञानाच्या अंधकाराकडुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
रामकृष्णहरी