Take a fresh look at your lifestyle.

मुळा धरण 80 टक्के भरले !

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच.

राहुरी : नगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांत मुळा धरणात मुबलक पाणी आल्याने 26000 दलघफू क्षमतेचे हे धरण काल सायंकाळी 80 टक्के भरले. या धरणातील पाणीसाठा 20800 दलघफूटावर पोहचला होता.

हरिश्चंद्र गड , आंबित, कोतूळ, आणि पारनेरात पाऊस होत असल्याने दोन दिवसांत या धरणात तब्बल 1200 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 467 दलघफू पाणी दाखल झाले होते. त्यामुळे काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 20670 दलघफू झाला होता. त्यानंतरही आवक सुरू असल्याने पाणीसाठा 20800 दलघफू झाला.

▪️असा आहे मुळा धरणाचा इतिहास.

मुळा धरणाला मुळा डॅम किंवा ज्ञानेश्वर सागर या नावाने देखील ओळखले जाते. मुळा धरणाची निर्मिती ही मुळा नदीवर 1972 ते 1974 च्या दरम्यान झाली. मुळा धरण हे राहुरी या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 38 किलोमीटर अंतरावर मुळा धरण आहे. मुळा नदीचे उगमस्थान हे हरिश्चंद्रगडावर आहे.

मुळा धरणाची उंची ही 48.17 मीटर म्हणजेच 158 फूट इतकी आहे. धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत. धरणाची लांबी हे 2856 मीटर म्हणजेच 9370 फूट इतकी आहे. मुळा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 26 टीएमसी म्हणजेच 26 हजार दशलक्ष घनफुट इतकी आहे.

मुळा धरणातून दोन कालवे जातात: डावा कालवा आणि उजवा कालवा. या कालव्यांमुळे नगर जिल्ह्यातील बराचसा भाग हा बागायत झालेला आहे. यामध्ये राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांना सिंचनाची व्यवस्था आहे.

मुळा धरणाच्या पाण्याचा उपयोग हा पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी होतो. नगर शहराला आणि आजूबाजूच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुळा धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे मुळा धरणाच्या शेजारी आहे. मुळा धरण परिसरात पर्यटक हे भटकंती साठी येत असतात.

▪️मुळा धरणाला कसे पोहोचाल? 

मुळा धरणाला पोहोचण्यासाठी नगर कडून आला तर तुम्हाला नगर मनमाड महामार्गावर असलेल्या फुले हॉटेल च्या पुढे गेल्यावर एचपी पेट्रोल पंप लागला की लगेच डाव्या हाताला जाणाऱ्या मार्गाने मुळा धरणाकडे जाणारा रस्ता आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून आला तर तुम्ही मुळा धरणाच्या कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्याने धरणापर्यंत जाऊ शकता परंतु तो मार्ग कच्चा असल्याने तुम्ही आणखी पुढे जाऊन फुले हॉटेल च्या अलीकडे असलेल्या उजव्या हाताच्या रस्त्याने मुळा धरणाकडे जाऊ शकता.