Take a fresh look at your lifestyle.

शिव छत्रपती हे श्रेष्ठ श्रीमंत कर्मयोगी !

श्रेष्ठ कर्म,धर्म आणि अष्टांग योगाने जनकल्याण शक्ती प्राप्त होते.

कर्म आणि धर्म यावर आपण कालच्या भागात चिंतन केले आहे. यासोबत अष्टांगयोग साधन करता आली तर समाजहिताची श्रेष्ठ कर्म करण्याची शक्ती प्राप्त होते.आपण अनेकदा काही वाचतो ते आवडतेही पण त्याचा पुर्णार्थ समजला नाही तर ते आपोआप विस्मरणात जाते.शास्राने अष्टांग योग सांगितला आहे.हे साधन करण्यास सांगितले आहे. पण नेमकी ही साधनेची आठ अंग कोणती आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ? 

योग साधनेची अष्टांगंः यम,नियम,आसन, प्राणायाम,प्रत्याहार,धारणा,ध्यान आणि समाधी.योग म्हणजे आत्मा,मन आणि शरीराचं मिलन.ही आठ अंगे व्यक्तीला आरोग्य,संपदा आणि शांती मिळण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत.
पहिला यम म्हणजे योगाभ्यासकासाठी नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्व. दुसरा नियम म्हणजे आत्मचिंतनाने स्वतःमधे जागृकता निर्माण करणे होय. तिसरा योग आहे आसन. मन आणि शरीराचा समतोल साधुन सकारात्मक रहाण्याचं बळ मिळवणे होय.चौथा प्राणायाम.श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेला सराव.पाचवा योग आहे,प्रत्याहार.मनाला सकारात्मक ठेऊन बळकट करण्याचे कार्य हा योग करतो. सहावा योग धारणा आहे. धारणा एकाग्र चित्त होण्याची कला शिकवतो. सातवा योग ध्यान. ध्यान म्हणजे जागृतीत शुन्य होण्याची कला.आणि आठवा योग म्हणजे समाधी होय.मनावर स्वार होण्याची कला समाधीने प्राप्त होते.
सज्जनहो असा अष्टांगयुक्त नमस्कार भगवंताला प्रिय आहेच,नव्हे नव्हे अशी व्यक्ती शिवरुपच होते.अशी व्यक्ती मनुष्याला मनुष्याप्रती प्रेमभाव जागवण्यातही समर्थ आहे. अशी व्यक्ती जगाला सतत काही तरी देत रहाते.समाजन्यायासाठी पेटुन उठते.त्यांच्या नुसत्या नामोच्चाराने सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. असा हा श्रीमंत योग कुणात पहायला मिळाला बरं !
राजाधिराज श्रीमंतयोगी शिवछत्रपती शिवरायांच्या जीवनात हा अष्टांग योग पहायला मिळतो. ‘श्रीमंत योगी’ हा शब्द त्यांना तंतोतंत लागु होते.निश्चयाचा महामेरु।सकल जनांशी आधारु।। हे ब्रिद राजांनाच शोभुन दिसतं.कारण असा सर्वोच्च अष्टांगयोग त्यांनी धारण केला होता.भयंकर संकटातही सर्वांची काळजी घेऊन त्यावर मात करणं असामान्य आहे.
मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेणं म्हणजे साक्षात मृत्युला दिलेलं अलिंगन होतं. नुसत्या जयघोषाने रक्तानं उसळ्या माराव्यात इतकं सामर्थ्य शिवछत्रपती नावात आहे. ते इतकं सहज मिळालं असेल का?शिवरायांचा त्याग आम्ही अनुभवायला हवा.एका हाकेवर हजारो मावळे जीव द्यायला तयार होते.जीव देणारी माणसं जीव लावल्याशिवाय भेटत नाहीत हे जरी आम्हाला समजलं तरी खूप आहे.श्रेष्ठ कर्म आणि धर्मरक्षण कसं करावं याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शिवराय.
आपण त्यांचं नाव घेऊन नेमकं काय करतो हा मोठा चिंतनाचा विषय आहे. राजांचा एक जरी गुण आम्हाला अंगिकारता आला तर आपल्या हातुन श्रेष्ठ कर्म नक्की घडतील.शिवदृष्टीने हा अभ्यास केला तर शिवश्रेष्ठ कर्मं आपोआप घडतील.
रामकृष्णहरी.