Take a fresh look at your lifestyle.

महाराज नावाची उपाधी घेणं अवघड नाही !

पण महाराज होऊन चित्तकृतीनं जगणं म्हणजे अग्निनिखाऱ्यावर झोपण्यासारखे आहे

 

माझ्या सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ मित्रहो.सोशल मिडिया हे असं माध्यम आहे, की आपल्यापैकी अनेकजण एकमेकांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही. आणि कदाचित आयुष्यभर भेटणारही नाही. पण या माध्यमातून आपण मित्र बनलो आहोत.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणुसकी लोपत चालल्याच्या अनेक घटना आपण वारंवार अनुभवतो.हे रोखणं कुणा एकट्याचं काम नाही. अत्याचार होताना पाहुनही आपण बरेचदा अशीच भुमिका घेतो की चला आपल्याला काय करायचय?नसत्या भानगडीत कशाला नाक खुपसायच ? अशावेळी त्रयस्थ भुमिका घेणं पसंत करतो आपण.

पण एखाद्याची निंदानालस्ती करताना,एखाद्याचं मोठेपण डोळ्यात खुपल्यावर आमच्यातला त्रयस्थ कुठल्याकुठे पळून जातो कळत सुध्दा नाही.

हे सारं ठिक आहे. शेवटी मदतीला धावणं हे हिमतीचं आणि वेळच आली तर बळाचही काम आहे.चला; या वृत्तीत बदल होवो हिच अपेक्षा.

महाराज….

कुणाच्याही नावापुढे लागलकी लागुनच जातं.यासाठी सध्याच्या काळात फार लायकी लागत नाही.म्हणजे आपलं काम अडलं की एखाद्याला आपण साहेब म्हणतो,मग तो शिपाई का असेना असंच आहे हे. आध्यात्मिक क्षेत्रात थोडी लुडबुड केली की मिळुन जाते ही पदवी.”महाराज”

(फक्त अध्यात्मिक क्षेत्राविषयी बोलतोय)

महा+राज

महा म्हणजे महत्तम,मोठे,विशेष, याहुन मोठं दुसरं नाही.

राज म्हणजे गुपित,रहस्य.

ज्यानं सर्वोत्तम मोठ राज जाणलं तो “महाराज”

अशी महाराज उपाधी मलाही चिकटली आहे.

माझ्या गुरुदेवांनी मला जे महत्तम गुपित सांगितलं आहे ते समस्त जगताला आनंदात न्हाऊन टाकणारं आहे. आनंद वाटण्याच्या अनेक कला मला त्यांनी शिकवल्या.वेदांच्याही पलिकडे जाऊन आनंदी जीवनाचा वेदांत मला शिकवला.

कथा किर्तनं करुन जगात आनंद वाटता येईल.पण याच बोलणाऱ्या मुखांनी दिनदुबळ्यांची,रंजल्या गांजलेल्या, अबाल वृध्दांची सेवा करण्यासाठी कंबर कसली तर आत्मानंदात न्हाऊन जाल. जगाला हसणं सोपं आहे.पण जगाला हसवणं सोपं नाही. विनोद करून काही क्षण हसवणं सोपं आहे. पण सेवेने आयुष्यभर हसवत ठेवणं कठीण असलं तरी अशक्य नाही. या तत्वाला अनुसरुनच गुरुदेवांनी

“नरसेवा नारायण पुजा”

या महामंत्राची निर्मिती केली असावी.

माझं महाराजपण याचसाठी कामी यावं.सेवेतला आनंद वाटता यावा.जातीधर्माच्या भिंती तोडून तो वाटावा हा माझ्या गुरुदेवांचाच शिरस्ता.

शत्रूचं सुध्दा वाईट चिंतन घडु नये.प्राप्त परिस्थितीत जे करावं लागेल ते सतसद्विवेकबुद्धि आणि मानवधर्म जपून बिनधास्त करावं.चुक की बरोबर यावर मानसिक द्वंद्व घडुच नये.

मन सदोदित प्रसन्न असलं पाहिजे. ठराविक एका सिमारेषेत हेवेदावे गुंडाळून ठेवता आले पाहिजेत.केवळ माणूस आणि माणूस म्हणूनच जगता आलं पाहिजे.

माझं महाराजपण पोपटपंचीतुन नव्हे तर माझ्या गुरुदेवांना अपेक्षित असलेल्या नरसेवेतून सिध्द व्हाव हिच सदिच्छा.

आपली सर्वांची सोबत मी माझी जमेची बाजू आहे. आपण सर्व मिळुन आनंद वाटुया.समाजात त्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासु लागली आहे. आपला खारीचा वाटा असेल पण तितक्यानही देव हसेलच.

जय जय राम कृष्ण हरी