संगमनेर : शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संगमनेरमध्ये चक्क जमिनीवर बसून विद्यार्थी,विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा फोटो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेअर केलाय. या फोटोची सगळीकडे चर्चा होत असून राजकारणात काही गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे असतात अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी आदित्य यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी संगमनेरच्या कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेस भेट दिली. ही शाळा आदर्श आदिवासी आश्रमशाळा म्हणून नावाजलेली आहे. यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळेपणाने तसेच आपुलकीने संवाद साधला.
आदित्य ठाकरे जमिनीवर बसले, टाळी देत संवाद
आदित्य ठाकरे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थिंनीशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ते विद्यार्थांसोबत जमिनीवर खाली बसले. तसेच एका विद्यार्थिनाली टाळी देत अडचणी जाणून घेतल्याक. मंचावर बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम उपस्थित असताना आदित्य ठाकरे थेट जमिनीवर बसल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आदित्य थेट जमिनीवर बसल्यानंतर विद्यार्थ्यांनीदेखील त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरेंची ही कृती बाळासाहेब थोरात यांना चांगलीच आवडली आहे. त्यांनी आदित्य यांचा फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवर अपलोड केलाय. तसं पाहायचं झालं तर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा एकूण तीन पक्षांची राज्यात सत्ता आहे. सरकार म्हणून हे सोबत असले तरी ठाकरे आणि थोरात यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. मात्र हे कच्चे दुवे मागे सोडून बाळासाहेब थोरात यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या या फोटोची विशेष चर्चा होत आहे.