Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक बँकेतील अपहार आणि अनियमिततेच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश !

तालुका उपनिबंधक यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती.

अहमदनगर: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक घड्याळ घोटाळ्यानंतर सन २०२०-२१ या अहवाल सालातील अनेक बाबींच्या अपहार आणि अनियमिततेच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून नगर तालुक्याचे उपनिबंधक यांची जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये घड्याळ खरेदी व वाटपामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्यामुळे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाचे पदाधिकारी प्रविण ठुबे, संतोष खामकर, गणेश वाघ यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी सहाय्यक निबंधक श्रीगोंदा तालुका रावसाहेब खेडकर यांनी पूर्ण केली होती.

तदनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी चालू असतानाच पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी बँकेकडून खुलासा मागवला असता अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने दाखल केलेल्या खुलाशाने समाधान न झाल्यामुळे आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची चौकशी लावण्यात आली आहे.
प्रविण ठुबे व इतर पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशान्वये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची चौकशी वेगवेगळ्या नऊ मुद्द्यांच्या आधारे करण्यात येणार आहे.

त्यामध्ये सन २०२०-२१या अहवाल सालातील चहापान खर्चावर आयुक्तांचे निर्बंध असताना तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आलेला आहे. सन २०२०-२१या अहवाल सालामध्ये जाहिरात खर्चावर निर्बंध असताना एक लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. कोरोना परिस्थिती असल्यामुळे ऑनलाइन मासिक मिटिंग व वार्षिक सर्वसाधारण सभा यावर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. पाथर्डी शाळा दुरुस्ती बिल रुपये १०लक्ष ६७ हजार एवढे काढल्यानंतरही अपहार करण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया डावलून परत अतिरिक्त पुरवणी बिलासाठी तरतूद करून ६ लाख ६४ हजार रुपये अतिरिक्त कराचे चुकीचे कारण दाखवून सदर रक्कम संचालक मंडळाने परस्पर हडप केलेली आहे. त्याचप्रमाणे कार्यालय नूतनीकरण व फर्निचर दुरुस्ती यावर निर्बंध असतानादेखील अवास्तव खर्च करण्यात आला आहे.

सन २०२०-२१ मध्ये इतर खर्च तब्बल साडेसात लाख रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे. कोरोना कालावधीमध्ये संचालक मंडळाने ऑनलाइन बैठका होऊनही प्रवास भत्ता एकूण ३०लाख ९० हजार रुपये खर्च केलेले आहे. संस्थेच्या तीन संचालकांनी वैयक्तिक लाभाच्या बँकेच्या योजनांचा लाभ वैयक्तिकरित्या घेतलेला असून ही बाब वार्षिक अहवालात न छापून सभासदांपासून दडवण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या अर्जातील सर्व १ ते ९ बाबींच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी नगर तालुक्याचे उपनिबंधक (सहकारी संस्था) यांची नियुक्ती दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ च्या आदेशान्वये केली आहे.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये सातत्याने होत असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये सलग दोन अडीच वर्षांमध्ये बँकेची दुसरी चौकशी असून कोरोना संसर्ग कालावधीमुळे मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाने सभासदांच्या कष्टाच्या व घामाच्या पैशावर डल्ला मारलेला आहे. या चौकशी आदेशाच्या कारवाईमुळे चार चार महिन्याला शिक्षक बँकेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड का केले जात होते, याची खरी कारणे आता सभासदांना समोर आली आहेत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिक्षक परिषद आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये अनेक घोटाळ्यांची मालिका दोन वर्षांतील सत्ताधारी कंपूने केली असून त्यामध्ये प्रामुख्याने घड्याळ खरेदी व वाटप घोटाळा, कर्मचारी फरक घोटाळा, पाथर्डी शाखा दुरूस्ती घोटाळा, सावित्रीच्या लेकी पुरस्कार घोटाळा, शौचालय घोटाळा, छपाई घोटाळा व सत्ता जाताजाता तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी केलेला बँक कर्मचारी पदोन्नती घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची मालिका गेल्या दोन-अडीच वर्षामध्ये भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी केली. परंतु या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही व ज्यांनी घोटाळे करून कोट्यवधी रुपये हडप केले त्यांच्याकडून ते वसूल करेपर्यंत आमची लढाई सुरू राहील, असे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे व रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी सांगितले आहे.
शिक्षक बँकेच्या शताब्दी निमित्त घड्याळ खरेदी मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी कलम ८३ अन्वये चौकशी अधिकारी ॲड. श्रीराम वाघ सध्या करीत . त्यांच्या चौकशी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून विरोध करणाऱ्या सभासदांना नोटिसा पाठवणाऱ्या आणि लोकशाही मार्गाने निषेध म्हणून घड्याळ वाटपावर बहिष्कार टाकणाऱ्या सभासदांचा अपमान करणाऱ्या शिक्षक बँकेच्या मुजोर प्रशासनाला लवकरच धडा शिकवला जाणार आहे.
मिनाक्षी तांबे-भालेराव
जिल्हाध्यक्षा, महिला आघाडी, शिक्षक परिषद, अहमदनगर
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत होत असलेल्या लांबलेली निवडणूक, अनियमितता व भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये शिक्षक परिषद आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळावतीने १३० सभासदांनी लोकवर्गणी करुन औरंगाबाद खंडपिठामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यांचा देखील निर्णय औरंगाबाद खंडपीठ मध्ये प्रलंबित आहे. भ्रष्ट प्रवृत्ती आणि भविष्यातील सत्ताधारी म्हणून येणाऱ्या संचालकांना कायमस्वरूपी धडा मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली असल्याचे शिक्षक परिषद आणि गुरुमाऊली मंडळाच्या उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष आर.पी.राहाणे यांनी सांगितले आहे.