Take a fresh look at your lifestyle.

राज्यपालांच्या भेटीनंतर अण्णा हजारे म्हणाले, चांगला ‘रिस्पॉन्स’ !

अण्णांच्या चरणी राज्यपालही नतमस्तक

राळेगणसिद्धी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आजच्या राळेगणसिद्धी दौऱ्यात जलसंधारण, पाणलोट, सौर उर्जा, शिक्षण आदी विषयांवर चर्चा झाली असून आपण सुचवलेल्या उपाय योजनेबाबत राज्यपालांनी सकारात्मक प्रतिक्रिया दाखवल्याचे सांगतानाच तुम्ही तरुणांना घेऊन राजभवनात या आपण चर्चा करून बदलाबाबत वरिष्ठांना सूचना करू असे सांगत राज्यपालांनी चांगला ‘रिस्पॉन्स’ दिल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन विविध विकास कामांची माहिती घेतली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून ग्रामीण विकासाबाबत राज्यात कसा बदल घडवून आणता येईल याबाबतही राज्यपालांनी माहिती जाणून घेऊन सकारात्मकता दर्शविली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील बोलून दाखविला.
महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात दुष्काळ सदृश्य तर काही राज्यात जास्त पाऊस अशी परिस्थिती आहे. यावर पर्याय काय? हे राज्यपालांना जाणून घ्यायचे होते यावर उपाययोजना सांगताना अनेक नालाबंडिंग या सदोष पद्धतीने झाल्या आहेत याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या दुरुस्तीसाठी काय करावे लागेल ही माहिती आपण राज्यपालांना दिली आणि हा शास्त्रशुद्ध प्रयोग त्यांनादेखील आवडला असून नालाबंडिंगच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचेही हजारे यांनी सांगितले.
राळेगणसिद्धी येथे सौर उर्जेवर राबविलेल्या विविध प्रयोगाबद्दलची माहिती दिल्यानंतर राज्यपालांनी समाधान व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सौरउर्जेकडे विशेष लक्ष देत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांचे राळेगणसिद्धी येथे आगमन होताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राज्यपालांच्या स्वागतासाठी गेल्यानंतर राज्यपाल अण्णांच्या चरणाशी नतमस्तक झाले.