Take a fresh look at your lifestyle.

जवळ्याच्या पीडित कुटुंबीयांची सुनिता पठारे यांच्याकडून सांत्वन !

पारनेर : तालुक्यातील जवळे याठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांची नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता पठारे यांनी गुरुवारी भेट घेतली. व त्यांचे सांत्वन केले. याबाबत नऊ दिवस उलटूनही संबंधित नराधमाला पोलीस पकडू शकले नाहीत. याबाबत पठारे यांनी खंत व्यक्त करून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाली आहे. खून करण्यापूर्वी मुलीवर अत्याचार झाला असावा, असा संशय शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
याची खातरजमा करण्यासाठी मुलीचा व्हिसेरा नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अत्याचार करून मुलीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत जवळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यांनी यासंदर्भात शिरूर बेल्हे रस्त्यावर आंदोलन सुद्धा केले.

मुलीच्या अंगावर जखमा व ओरबडल्याच्या खुणा आढळल्याने प्रकार घडत असताना मुलीने मोठा प्रतिकार केला असल्याचे शवविच्छेदनातून पुढे आले आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या घरात आढळला होता. मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. न्यायवैद्यक तज्ञांच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार निलेश लंके यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
जवळे येथे अवैध दारूविक्रीसह इतर अवैध व्यवसाय फोफावले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे. त्यातूनच मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप सरपंच अनिता आढाव यांनी केला होती . महिलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती . येत्या दहा दिवसांत हत्येचा तपास लागला नाही, आरोपींना अटक झाली नाही तर मुलीचा दशक्रिया विधी जवळे बसस्थानकासमोर करण्याचा इशारा महिलांनी दिला होता. गुरुवारी नऊ दिवस उलटले तरी आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. दरम्यान नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या आणि मुळ जवळे स्थित असलेल्या सुनीता पठारे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. मृत मुलीच्या आई-वडिलांना बरोबरच नातेवाईकांची सांत्वन केले. नऊ दिवस झाले तरी आमच्या मुलीचे मारेकरी आणि अन्याय अत्याचार करणारे पोलीस पकडू शकले नाहीत . पोलीस यंत्रणा पूर्णपणे ढिली असून त्यांच्यावरील आमचा विश्वास उडाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया मृत मुलीच्या नातेवईकांनी दिली. दरम्यान याबाबत सुनिता पठारे यांनी त्यांना धीर देत या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने करावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आपण पत्र देऊ अशी ग्वाही यावेळी दिली. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने आपण शंभर टक्के प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी निलेश पठारे, गणेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली सालके उपस्थित होत्या.
अशाप्रकारे राजरोसपणे एखाद्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला जातो ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पारनेर सारख्या पुरोगामी विचारांच्या तालुक्यात असा घृणास्पद प्रकार घडला याबद्दल खंत वाटते. या पार्श्वभूमीवर मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या लेकरावर अशा प्रकारे अन्याय होऊन तिचा खून करण्यात आला हीच घटना संपूर्ण जवळे गावच नाही तर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हादरा देणारी आहे. याबाबत पोलिसांकडून अद्यापही ठोस असा तपास करण्यात आलेला नाही. म्हणून या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री आणि पूर्व मंत्र्यांना आपली पाठवणार आहे.
सुनिता पठारे
सामाजिक कार्यकर्त्या नवी मुंबई