Take a fresh look at your lifestyle.

सत्य लपवता येत नाही !

मनुष्यप्राण्याचा मुळ स्वभाव प्रगट होतोच.

आपण जसे नाहीत तसे दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस आपण मुळ स्वभावात प्रगट होतो.आपण अंतरी शुद्ध असु तर ते ही परिस्थितीनुरूप जगाला दिसतेच.सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही.स्वभावतः ते बाहेर येतेच.जगदगुरु संत तुकोबारायांनी या अभंगात अनेक उदाहरणांद्वारे ते सिद्ध केलं आहे.
न लगे चंदना पुसावा परिमळ I वनस्पतिमेळ हाकारुनी ।।१।। अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी I धरितां ही परी आवरे ना ।।२।। सूर्य नाहीं जागें करीत या जना I प्रकाश किरणा कर म्हून ।।३।। तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें I लपवितां खरें येत नाहीं ।।
विविध वनस्पतींच्या गर्दीतही चंदनाचा सुगंध कोणाला विचारावा लागत नाही. तो काही लपून रहात नाही. जे आत आहे ते स्वभावतःच आपोआप बाहेर येतं, ते अडवायचा प्रयत्न केला तरी अडवता येत नाही. लोकांना जागं कर असं सूर्य काही आपल्या प्रकाशकिरणांना सांगत नाही. पण सूर्य उगवला की लोक आपोआप जागे होतात.

तुकोबाराय म्हणतात,ढग पाहून मोर आपोआप नाचायला लागतो, त्याला आपला आनंद लपवता येत नाही.तसेच सत्य लपविता येत नाही, ते आपोआपच प्रकट होत असतं.
या अभंगाद्वारे महाराजांनी स्वभावलक्षण सांगितले आहे.आपण हे नित्य अनुभवतही आहोत.यात सदगुणांची पखरण असेल तर आनंदच देणारे आहे. एकदा एका साधकाची एका असाधकाला परीक्षा घ्यायची लहर आली.हा साधक बर्फाळ प्रदेशात रहात होता.तिथेच छोटसं झोपडं बांधलेलं होतं आत अग्नीकुंड पेटवलेलं जे बर्फाळ थंडीपासून त्याचं रक्षण करत होतं.तेथेच नामचिंतन करण्याच सर्वाधिक काळ जायचा त्याचा.रात्रीची वेळ होती त्याच्या झोपडीचे दारावर टकटक झाली. साधकाने दरवाजा उघडला बाहेर एक व्यक्ती नग्नावस्थेत उभी होती.त्याने आश्रयाची विनंती केली.साधकाने तात्काळ त्याला आत घेतले.आपल्या अंगावरचे कपडे त्याला घालायला दिले.उबदार रग दिला.आणि स्वतःकेवळ लज्जारक्षणासाठी एक वस्र बांधून झोपडीच्या एका कोपऱ्यात बसुन राहिला.
दोघे झोपु शकतील एवढी जागा नव्हतीच.आता मध्यरात्र उलटुन गेली होती.दारावर पुन्हा टकटक झाली. साधकाने दार उघडलं एक पांथस्थ बाहेर उभा होता,तो ही विवस्त्र होता.त्यानेही आश्रय मागितला.साधकाने त्याला आत घेतले पण जागा शिल्लक नव्हती मग स्वतःसाधक झोपडीच्या बाहेर आला.बर्फाची भुरभुर चालु होता.कडाक्याची थंडी होती.बराच काळ गेल्यानंतर साधक रडु लागला.आता परीक्षा घेणाऱ्या असाधकाला आनंदाच्या उकळ्या फुटु लागल्या.तो मनातल्या मनात म्हणत होता,खूप साधुचं जीवन जगत होता,संन्यास,वैराग्य कुठं गेलं आता?त्या असाधकाचा दुसऱ्याला त्रास देण्याचा मुळ स्वभाव उफाळून आला होता.मग तो त्या साधकाजवळ गेला आणि त्याला म्हणाला,”बर्फात गारठल्यावर रडु आलं ना?कशाला वैराग्याचं अवसान आणता?”त्यावर तो साधक म्हणाला,”मी बर्फात,या थंडीत उभा आहे याचं मला रडु येत नाही. मी रडतो आहे कारण आत बसलेल्या एका व्यक्तीसाठी मी काहीच देऊ शकलो नाही. हे लज्जारक्षणासाठी ठेवलेल्या कपड्याचा मला मोह का झाला?या विचारांनी मला रडु आलं आहे.” साधकाचं हे उत्तर ऐकुन तो चक्रावून गेला.लज्जित झाला आणि खाली मान घालुन निघुन गेला.
सज्जनहो साधक पवित्र होता.त्याग त्याचे ठायी ठासून भरलेला होता.ते त्याच्या आचरणातुन प्रगट झाले.मुळ स्वभाव बाहेर आला.आपण समाजात अनेक बुरखाधारी माणसं पहातो.मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या व्यक्ती संकटात मदतीला धावुन येत नाहीत. त्यांची सत्यता अखेर कळतेच.पण संकटसमयी मदत करणारे त्या चंदनाप्रमाणे असतात.ते त्या मयुराप्रमाणे असतात.अंतरी निर्मळ रहाता आले तर समाजासाठी चंदन होऊन शितलता प्रदान करण्याचं आणि सुविचारांचा परिमळही देता येईल.
रामकृष्णहरी