Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील कॉलेज “या” तारखेपासून सुरू होणार !

सीईटीचं वेळापत्रकही जाहीर.

 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात बंद असलेले शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे. दरम्यान, राज्यातील महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महाविद्यालये 2 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत आणि सीईटी परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील महाविद्यालये येत्या 2 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु करायची की ऑफलाईन पद्धतीने सुरू करता येईल हा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

या कालावधीत होणार सीईटी परीक्षा दरम्यान उदय सामंत यांनी यावेळी महाविद्यालयीन प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या. येत्या 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाईल अशी माहिती सामंत यांनी दिली. तसेच यावर्षी सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या वर्षी सीईटीची 197 केंद्रे होती. यावर्षी त्यात आणखी 29 केंद्रांची वाढ करण्यात आली असून सीईटी केंद्रांची संख्या आता 226 असेल. यंदा सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.