Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच जाहीर केले मोठे ‘गिफ्ट’ !

पाच लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार शून्य टक्के व्याजदरात.

नगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना शासनाच्या व्याजदर परतावा धोरणानुसार ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाते. ही सवलत मुदतीत कर्ज भरणाऱ्यांना देण्यात येते; परंतु तीन लाखांपुढील कर्जासाठी १० टक्के व्याज आकारले जात होते. यावर जिल्हा बँकेच्या सभेत सविस्तर चर्चा झाली.
बँकेच्या संचालक मंडळाने ३ ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ९ लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या माध्यमातून ३ लाख शेतकरी कर्जदार सभासदांना २ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी १ हजार ७२६ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.
या शेतकऱ्यांना मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व कर्जाची वेळेत परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी केले आहे.