Take a fresh look at your lifestyle.

सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी संजय काळे यांची निवड !

आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास सार्थ ठरविणार.

पारनेर :तालुक्यातील माळकुप येथील सरपंच संजय काळे यांची सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. संघाचे राज्य संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
सरपंच काळे यांनी आदिवासीबहुल असणाऱ्या माळकुप या गावात केवळ आठ महिन्याच्या कालावधीत विविध विकास योजना राबविल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासूनचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गावातील पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट याचबरोबर गावातील तंटे मिटविणे,अंतर्गत रस्त्यांचे वाद मिटवण्याचे कामही सरपंच काळे यांनी केले आहे.पारनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचेही काळे उपाध्यक्ष आहेत.कोणत्याही पदावर नसताना देखील त्यांनी गावातील गोर गरीब घटकांना उज्वला गॅस योजनेअंतर्गत 120 गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे.
माळकुप येथील अनुसूचित जमातीच्या घटकांच्या घरकुल योजनेसाठी सरपंच काळे हे प्रयत्नशील असून त्यांच्या प्रयत्नातून शबरी व इतर घरकुल योजनेतून 80 घरकुले मंजूर झाले आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनीही या घरकुलांच्या जागेची पाहणी केली तर राज्यातील अद्यावत वसाहत माळकुप येथे उभी करण्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. सरपंच काळे यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाने त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.
आपल्या सारख्या छोट्याशा खेडेगावातील सरपंचाची तालुकाध्यक्षपदी निवड करून सरपंच सेवा संघाने आपल्यावर मोठा विश्वास टाकला आहे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो विश्वास सार्थ करणार असून ग्रामविकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच काळे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.या निवडीबद्दल सरपंच काळे त्यांचे आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन केले आहे.