Take a fresh look at your lifestyle.

आपण खासच आहोत हे कळायला हवं !

आपल्यातल्या खासला बाहेर काढणे हे चॅलेंज आहे.

हो,आपण प्रत्येकजण खास आहोत. पण हे खासपण आहे तरी काय? ते खासपण आहे,आपल्या प्रसन्नतेत.कशी मिळवायची प्रसन्नता?
मानवी शरीर एक अद्भुत रचना आहे.
ईश्वर मानणारे म्हणतील,ईश्वराच्या कृपेने हे मनुष्यशरीर मिळाले.
न माननारे म्हणतील,विज्ञान असं सांगतं,अशी,अशी पृथ्वी निर्माण झाली, अशी जीवसृष्टी निर्माण झाली. यात देव,परमेश्वर असं काही नाही. मला अस्तिक,नास्तिक यावर चर्चा करायची नाही. आपण प्रत्येकजण खास आहोत यावर बोलायचं आहे.जेव्हा बाळ जन्माला येतं,तेव्हा त्याला हसायला,रडायला शिकवतो आपण? नाही ना?

पण बाळ काय केल्याने हसेल किंवा रडेल, हे बरोबर कळतं आपल्याला.
पण बालपण जाऊन तारुण्यात आलं कि या साऱ्याचा विसर पडतो.हसायची कारणं बदलतात,रडणं सुद्धा अतार्किक.
प्रत्येक दिवस आनंदाने जात नाही. कित्येक रात्री चांगल्या झोपेशिवायच गेल्या असतील अनेकांच्या.श्रीमंत होणं हा एकच निकष लावुन वाढवलेली पोरं आनंदाने जगतीलच कशी?
अकाली मृत्यूचं प्रमाण अफाट वाढलं आहे.माणसं यांत्रिक झाली आहेत.आणि आपलं खासपण त्यात विरुन गेलं आहे.
कधीतरी दुसऱ्याला हसवण्याच्या नादात आम्ही हसलो होतो, हे आता आठवेना झालयं.
आता पैसा नसेल तर आनंद नाही. इतका महाग करून ठेवलाय आनंद. काय देणार आहोत आम्ही आम्हाला आणि पुढच्या पिढीला?गलिच्छ राजकारणाचे धडे?कुणाला कसं संपवायचं याचे धडे?दुसऱ्याला लुटून कसं श्रीमंत व्हायचं याचे धडे?

पैसा कमावण्याला प्रथम पसंती देणारे यांत्रिक होणार यात शंकाच नाही.नाती सांभाळणं म्हणजे त्यांचेसाठी पैसा नष्ट करणे होय.जपणूक कळायला हवी.त्यासाठी पैसा हे साधन म्हणून लागते माध्यम म्हणून तो महत्त्वाचा नाही.हे जर समजलं नाही तर मग आईबाप,भाऊ,बहीण या नात्यांचा बोजा होणार.
सेवा जर घरातच घडु शकणार नाही, तर समाजासाठी काय करणार?
आपण खासपण दुसऱ्यांना आनंदी केल्यानेच कळतं बरका!
पैशाला सर्वस्व मानणारांनी एकदा हा प्रयोग करून पहावा.मग मानसिक, शारीरिक आजार छुमंतर होतील. आपल्याला जे हवं ते इतरांनाही हवच असतंना?
झाल तर मग! तुम्हाला दुःख हवं असेल तर ते दुसऱ्याला द्या.झालं काम. आनंद हवा आहे?
तो आपोआप मिळेल का?
अडल्या नडलेल्या,गोरगरिबांना मदत करा.आपण देवदुतच आहोत हे मनाला वारंवार सांगा.मग पहा ,देण्याची शक्ती आपोआप प्राप्त होईल. त्यासाठी आपली गरीबी आडवी येत नाहीच.

पाच,सहा वर्षे झाली असतील या घटनेला,एका दशक्रिया प्रवचनासाठी गेलो असता मयत व्यक्ती तरुण होती मागे लहान मुलं आहेत काही आधार नाही. असं कळालं.मग प्रवचनादरम्यानच मदतीचं आव्हान केलं.जवळजवळ दोन लाख रुपये गोळा झाले.अनेक दानशूर हात पुढे आले पण माझ्या आजही ती वृद्ध माता जशीच्या तशी नजरेसमोर आहे,तिने माझ्या हातात तिस रुपयांची चिल्लर दिली होती.हे दान सर्वात मोठं आहे. तिला भिक्षेत मिळालेली ही चिल्लर होती.श्रीमंती ही मनाची असली कि कमी काही पडतच नाहीहो…जो देतो तो देव.देणारा देव होतो. मग?होणारना देव?
नाती सांभाळू नका, तर ती जगा,जपा.आईवडिलांना भरभरून प्रेम दया. जगाच्यापाठीवर ते एकमेव आहेत,ज्यांना कुठल्याही मोबदल्याशिवाय
तुमचं भलं करायचय.तुमचं खासपण ओळखा.
आणि आनंदाने जगा,प्रत्येक दिवशी.
रामकृष्णहरी