Take a fresh look at your lifestyle.

“बायकोने मारलं तरी सांगतील केंद्राने मारलं !”

देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला.

नांदेड: महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेमच राहिला नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईटच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत, अशी सणसणीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली.
पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोने मारलं तरी केंद्रानं मारलं असे सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.
खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर बरं झालं असतं. मात्र, ही निवडणूक आल्यावर या माध्यमातून येथील मतदारांना एक संधी मिळालीय.

राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय. या सरकारने 2 वर्षात राज्यात केवळ भ्रष्टाचार केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गरीबांना घर मिळालं पाहिजे. पण या सरकारने गरीबाला एकही घर दिले नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या धाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशोबही ठेवलाय, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
दरम्यान, आमच्या काळात पाच वर्षात एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट केले नाही. एकाही शेतकऱ्याची त्याबाबत तक्रार नाही. मात्र, या सरकारमध्ये सर्रास वीज कापली जात आहे. नांदेडमध्येही हे फक्त पोटनिवडणुकीसाठी थांबले आहेत. एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग येथेही वीज कट करायला येतील, असंही फडणवीसांनी सांगितले.