Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार, नितीन गडकरी आता ‘डॉक्टर’ होणार !

कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल विद्यापीठाकडून सन्मान.

राहुरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली.

राज्यपाल दोन दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवारी (ता. 28) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असणार आहेत.

या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्रकुलपती तथा कृषिमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि रस्ते, वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.याच दौऱ्यात राज्यपाल राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ला भेट देणार आहेत.