Take a fresh look at your lifestyle.

जवळ्याच्या “त्या” घटनेवर चित्रा वाघ प्रचंड संतापल्या !

पोलिस, प्रशासनाचा वचकच राहिला नसल्याची टीका.

पारनेर : जवळा येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या घटनेला काही दिवस उलटले तरी अद्यापही संशयितांना देखील ताब्यात घेण्यास पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याने भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आज जवळा येथील पीडितेच्या घरी त्यांनी भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पारनेर तालुक्यात अलीकडच्या काही दिवसातच खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत मात्र, खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही. जवळा येथील दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडल्यानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जवळा येथे मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पीडितेच्या कुटुंबीयांना भाजपाच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, पोलीस व प्रशासनाचा वचक राहिला नसल्यानेच अशा घटना घडत आहेत.जवळा येथील घडलेली ही घटना अतिशय निंदनीय आहे. या कुटुंबियांना राज्य महिला आयोगाच्या वतीने मदत निधी देण्याची तरतूद आहे मात्र,निधी तर सोडाच या प्रकरणावर राज्य महिला आयोगाने साधा भ्र शब्द सुद्धा काढला नसल्याची खंत यावेळी चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात देखील पोलीस यंत्रणा अपयशी झाल्याचे सांगत लवकरात लवकर आरोपींचा शोध न लागल्यास भाजपाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही वाघ यांनी दिला.
यावेळी जवळा येथील ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला. पीडित मुलीच्या दशक्रिया विधीच्या आधी संबंधित आरोपींना ताब्यात न घेतल्यास या मुलीचा दशक्रिया विधी बसस्थानकासमोरच करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पीडित मुलीच्या कुटुंबाच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी नगर येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भैय्या गंधे, माजी तालुकाध्यक्ष कृष्णाजी बडवे, रामदास घावटे, बाळासाहेब सालके आदी यावेळी उपस्थित होते.
प्रदेश भाजपाच्या वतीने पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन मदत निधी देण्यासाठी चित्रा वाघ यांनी पीडितेच्या घरी भेट दिली. यावेळी सुजित झावरे यांच्या हस्ते निधीचा धनादेश मुलीच्या वडिलांकडे सुपूर्द करताना पीडितेच्या वडिलांनी धनादेश स्वीकारण्यास नकार देत हंबरडा फोडला यावेळी उपस्थितांची मने हेलावून गेले.पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर धनादेश स्विकारला.