Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंकेंनी व्यक्त केला कलाकारांप्रती कळवळा !

"मी कलावंतांच्या डोळ्यात अश्रु बघू शकत नाही !"

 

नगर : कोरोना काळात कलावंतांचे खूप हाल झाले. सर्वात जास्त नुकसान कलावंतांचे झालं. या कलावंतांची फारशी दखल कुणी घेतली नाही. मात्र मी कलावंतांच्या डोळ्यातील अश्रु बघू शकत नसल्याचे सांगत माझ्या आमदारकीचा फायदा कलाकारांनी करून घ्यावा. मी तुमच्यासाठी आमदार नाही तर तुमचा भाऊ आहे. तुम्ही वाटेल ते मागा मी द्यायला तयार आहे असे प्रतिपादन पारनेर- नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केले.

वडगाव गुप्ता येथे रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार व कलावंतांना अपघात विमा पत्राचे वाटप आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सीताराम काकडे हे होते तर चित्रपट अभिनेते प्रकाश धोत्रे, पारनेर तालुका अध्यक्ष बाबासाहेब तरटे,सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष शाम शिंदे, कार्याध्यक्ष भगवान राऊत, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, माजी सरपंच भानुदास सातपुते, प्राचार्य शिवाजी घाडगे उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, कलाकारांना एका कार्यक्रमातून हजार दोन हजार रुपये मिळतात त्याच्यावर त्यांचं कुटुंब चालतं. या कलाकारांना आपण त्यांचा मेहनताना द्यायला मागेपुढे पाहतो ही योग्य गोष्ट नाही. या देशातील तरुण घडले पाहिजे, कलाकार घडले पाहिजे. कलाकार घडले तरच देश घडणार आहे. वडगाव गुप्ताच्या कलावंतांसाठी भव्य असे सांस्कृतिक भवन मी द्यायला तयार आहे. त्यासाठी कितीही पैसे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही. या सांस्कृतिक भवन मध्ये महाराष्ट्रातील कलाकारांनी येऊन प्रॅक्टिस करावी असा भव्यदिव्य प्रॅक्टिस हॉल लवकरच उभारणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर अजितदादांच्या माध्यमातून कलावंतांसाठी कायमस्वरूपी काही योजना तयार करता येईल का याचा प्रस्ताव तयार करून त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.
यावेळी प्रा. सीताराम काकडे, चित्रपट अभिनेते प्रकाश धोत्रे, डॉ. बबनराव डोंगरे विजयराव शेवाळे, प्राचार्य शिवाजी घाडगे यांची भाषणे झाली.यावेळी सांस्कृतिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अजय कुमार पवार, चित्रपट अभिनेते राधाकृष्ण कराळे, उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर अडसुरे,ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय शेवाळे, रंगमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घाडगे, सांस्कृतिक सेलचे तालुका उपाध्यक्ष गणेश कराळे, अविनाश डोंगरे, गोरख सातपुते, ज्ञानेश्वर आजबे, सागर पालवे, केशव पठाडे यांनी परिश्रम घेतले. सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डोंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक सेलचे जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण यांनी केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले.