Take a fresh look at your lifestyle.

ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालयं !

आमदार प्रणिती शिंदेंचा केंद्रावर हल्लाबोल.

 

 

सोलापुर : भाजपाकडून महाविकास आघाडीतील मंत्री व नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून टार्गेट करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपाला खडेबोल सुनावले होते. राऊतांपाठोपाठ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. भाजपाला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आता बस्स झाले. ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल असा इशारा दिलाय. यानंतर महाविकासाआघाडीतील सर्व नेते या विरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच आता काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी कारवाईवरून ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, असे विधान केले आहे.
सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत प्रणिती शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ”देशात एकंदरच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मी आज त्यांच्याविरोधात बोलत आहे म्हणून उद्या माझ्याही घरी ईडीवाले येतील. ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे”, अशी खरमरीत टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. यावेळी त्या सोलापुरात बोलत होत्या.
दरम्यान, आज देशात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम भाजप आणि पंतप्रधान मोदीजी करीत आहेत, काही लोक भीतीने घरात बसले आहेत. कधी कोणाच्या घरात घुसतील सांगता येत नाही, असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. या लोकांनी काय हाल करून ठेवले आहेत असे म्हणतानाच समझनेवालो को इशारा काफी होता है, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.