Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता ? चमच्याने बोगदा खोदून 6 कैदी फरार !

"त्या" तुरुंगात घडले असे काही...

 

इस्त्राईल : जगातील बहुतेक फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपट हे जेल ब्रेकवर तयार झाले आहेत. अनेक चित्रपटांमध्ये तुरुंगातील हिरो बाहेर पडण्यासाठी काही ना काही प्लॅन तयार करीत असतो आणि कडक सुरक्षा असूनही तो त्याच्या मिशनमध्ये सक्सेस होतो. इस्रायलमध्येही अशीच एक घटना घडली. यात बोगदा खोदून अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तुरुंगातून सहा गंभीर गुन्ह्यातील कैदी फरार झाले आहेत.

उत्तर इस्राईलमधील गिलबोआ तुरुंगातील ही घटना आहे. पोलिसांनी माहिती दिली की, तुरुंगातून पळून गेलेले सर्व सहा कैदी एकाच पोलीस कोठडीत होते. त्यांच्यापैकी पाच इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित आहेत आणि एक त्याच्याशी संलग्न असलेल्या सशस्त्र गटाचा माजी कमांडर आहे.

उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगातून सुटण्यासाठी कैद्यांनी चक्क बाथरूममध्ये सिंकखाली हळूहळू काही दिवस एक बोगदा खोदत राहिले आणि निसटले. त्यांनी हे काम गंजलेल्या चमच्यांच्या मदतीने केले असल्याचे समजले. ते अनेक दिवस बोगदा खोदत राहिले. हे कैदी एक एक करून येत आणि बोगदा खोदत असत, रोजचं आपलं आळीपाळीने खोदण्याचं काम झालं की बाहेर येऊन ते एकदम शांत व सामान्य कैद्यांसारखेच वागायचे. अत्यंत हुशारीने आणि शांततेत हे काम केले की कोणालाही याविषयी पत्ता लागू दिला नाही.

कैद्यांनी बाथरूममधून तुरुंगाच्या बाहेर एक बोगदा खोदला आणि सोमवारी तिथून पळ काढला. पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ‘कैद्यांचा तपास चालू झाला आहे. आला आहे. ते आता जवळच्याच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक भागात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि पोलीस दल त्यांचा कसून शोध घेत आहेत. याशिवाय 400 कैद्यांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे.’

इस्लामिक जिहादने जेल ब्रेकबाबत आनंद व्यक्त करत, पळून गेलेल्या कैद्यांना नायक म्हटलं आहे. त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाईचे वाटपही केले आहे. हमासचा प्रवक्ता फावदी बारहौम म्हणाला की, हा एक मोठा विजय आहे, हे इस्त्रायली तुरुंगात असलेल्या आमच्या शूर सैनिकांची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचा पुरावा देणारी घटना आहे.