Take a fresh look at your lifestyle.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर !

अण्णा हजारेंची भेट तर विखे पाटलांकडे मुक्काम !

नगर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे येत्या बुधवारपासून दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होणार आहे. लोणी येथेही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असून २७ ऑक्टोबरच्या रात्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्रामगृहात ते मुक्कामी थांबणार आहेत.दुसऱ्या दिवशी ( गुरुवारी) ते राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. तसेच आदर्शगाव हिवरेबाजारलाही राज्यपाल भेट देणार असून तेथेही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.
राज्यपालांच्या प्राथमिक दौऱ्याचे नियोजन प्राप्त झाले असून त्याला अंतिम स्वरूप अद्याप यायचे आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांचा दौरा असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभासाठी कुलपती या नात्याने राज्यपाल येत आहेत. त्याला जोडून इतर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
लोणी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्या नव्या ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमिपूजन, डॉ. बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांच्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाचे नियोजनही लोणीतच सुरू असल्याची माहिती आहे.
दुसऱ्या दिवशी राज्यपाल आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. थेट राज्यपालच हजारे यांच्या भेटीला येत असल्याने या भेटीकडे लक्ष लागून आहे. मात्र, या दौऱ्याची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत हजारे यांच्या कार्यालयाला मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथे वेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही.
हिवरेबाजारमध्ये शाळेच्या इमारतीचे उद्घाटन, गवत कापणीचा प्रारंभ आणि ग्रामस्थांशी संवाद, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पोपटराव पवार यांनी दिली.