Take a fresh look at your lifestyle.

लोक काय म्हणतील ?भिती कशाची आहे?

तर ही भिती प्रतिष्ठेची आहे.

मी अधिकारी आहे मग मी सामान्य माणसासारखं वागुन कसं चालेल?मी धनाढ्य आहे मग मी साधं जीवन जगलो तर लोक काय म्हणतील?मी मोठा सभ्य माणुस मग मला हॉटेलमध्ये जेवनताना पाहिलं तर लोक काय म्हणतील?मी मोठा महाराज आहे, मला कुणी चित्रपट पाहताना पाहिलं तर लोक काय म्हणतील?,मी मोठा तालेवार मनुष्य नोकरचाकर दिमतीला आहेत मग मी पंगतीत बसुन भोजन कसं करावं?अशी कितीतरी उपाधीची धांडोळी सोबत घेऊन आपण जगत असतो.
आपण नेहमी दुसऱ्यापेक्षा वरचढ वागण्याचा प्रयत्न करीत असतो.आपण कुणी वेगळे आहोत,असा दाखवण्याचा प्रयत्न जो तो करीत असतो.पण खरं सांगु का?हे वेगळेपण, बिरुदावल्या मिरवताना खूप त्रास होत असतो.पण नाविलाजाने काही गोष्टी आपण रेटतच रहातो.

एकदा असं झालं,एका गावात प्रवचनानिमित्त जाणं झालं.प्रवचन आटोपल्यावर महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा होता.अगदी घमघमाट सुटला होता.आम्ही पंगत धरून बसलो.भुकही सपाटुन लागलेली होती.माझ्या पर्यंत वाढप्या आला त्यानं मला पाहिलं आणि मोठ्याने म्हणाला,महाराज तुम्हाला तर आज चतुर्थी असेल ना? माझा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.उसनं अवसान आणुन मी म्हटलं,उपासाचं काही नाही का?
मग मला ताबडतोब एका सज्जनाने शेंगदाणे गुळ आणुन दिला.मला माझी महाराज नावाची प्रतिष्ठा जपावीच लागली.मला चतुर्थी नाही असं म्हटल्यावर लोक काय म्हणतील?हा प्रश्न मला पडलाच.आपली पत प्रतिष्ठा किती खरी किती खोटी हा वैयक्तिक चिंतनाचा विषय आहे.

पण या उपरांत कितीतरी मोठी माणसं मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहेत.सगळं काही भरपूर आहे पण कधीच त्यांच्या देहबोलीतून हे व्यक्त होणारच नाही. संपत्तीची नशा त्यांना चढतच नाही. अशी माणसं जीवन कसं जगावं हे शिकवतात.
तुकोबाराय म्हणतात,
उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव।होय माझा जीव कासावीस।।
तुका म्हणे काही आणीक न साहे।आवडती पाय वैष्णवांचे।।
महाराज म्हणतात,या उपाध्यांनी माझा जीव कासावीस होतो.ते भक्तीपासुन दुर नेणारं नाही. म्हणून मला फक्त वैष्णवांचे पाय आवडतात.कारण त्यामुळे कोणत्याही उपाधीचा माज चढत नाही. ताठा,तोरा मिरवण्याची लहर येत नाही. आपल्या उपाध्या आपल्याला माणसांपासून दूर नेणार नाहीत याची पदोपदी काळजी घ्यायला हवी.लोक काही कार्याने मोठेपणा देतील.तो स्विकारावाच लागतो.पण ज्ञान विनयतेने शोभते,मोठेपण सामान्य जीवनातच सामावलेले आहे.
पद्मभूषण अण्णासाहेब हजारेंनी ठरवलं असतं तर आलिशान महालात राहु शकले असते.पण याची गरज नाही. हे त्यांनी जगाला दाखवून दिले.आपल्या कार्याचा ठसा जगात उमटवणारी सर्व मोठी माणसं उपाध्यांपासुन दुर राहिली.भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्री याचं उत्तुंग उदाहरण आहे.राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं जीवन म्हणजे एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. आम्ही नसलेल्या मोठेपणात का अडकतोय?हा खरा चिंतनीय विषय आहे.शेवटच्या क्षणी तो मोठेपणा कामी येत नाही.मनुष्य संपदा हिच खरी श्रीमंती आहे.
रामकृष्णहरी