Take a fresh look at your lifestyle.

पराभवाचं पांढरं निशाण ज्याला कळालं तो सुज्ञ !

नको ती आणि नको तितकी हुशारी काही कामाची नाही.

 

वयपरत्वे प्रगल्भता येते.अर्थात ती प्रत्येकात येईलच आणि तीही वेळेवर येईलच असं सांगता येत नाही. तारुण्यात झालेल्या चुकांचा कितीही पश्चाताप केला तरी त्याचा काहीच उपयोग नसतो.ती चुक सुधारण्यासाठी शरीर साथ देऊ शकत नाही. वेळीच चुका दुरुस्त करता आल्या किंवा तशी सद्बुद्धी झाली तर ते आपले भाग्यच म्हणावे लागेल.

ज्ञानोबाराय म्हणतात, दाढी साऊळ धरी।मान हालौनि वारी।तरी जो करी।मायेचा पैसु।।

अर्थःदाढी पांढरी होते,मान हलते तरीही जो मायेत गुरफटून प्रपंच पसारा वाढवत रहातो.

सज्जनहो आपण सारेच मायेत अडकलेले मनुष्यप्राणी आहोत.माऊली म्हणतात, मायेत अडकलेल्या जीवाची तऱ्हा काय सांगावी?वयपरत्वे केसं पांढरे होतात,शरीर कंप पावू लागते.मान सांभाळणे सुद्धा अवघड होते.आमचे दाढीचे पांढरे झालेले केस पराभवाचे निशान दाखवत असतात.आता फार वेळ राहिला नाही हे लक्षात येण्यासाठी ही रचना आहे पण मनुष्य स्वतःला सदैव तरुण समजत रहातो.सत्तरी,ऐंशी गाठुन मृत झालेल्या व्यक्तीबद्दल लोक म्हणत असतात,आता कुठे बसुन खाण्याचे दिवस आले होते.

वास्तविक यात अजिबात तथ्य नाही. शरीर वृद्धापकाळाने ग्रासु लागले की फापटपसारा थांबवला पाहिजे. निवांत,निर्लेप, निष्काम भावाने जगता जगता देह ठेवता आला पाहिजे. पण हे एवढं सोपं नाही हे मलाही मान्य आहे.आपण वयपरत्वे पसारा घालायचा कमी केला तरी बराचसा प्रवास सुखाचा होईल. माझ्या सहवासात अनेक जेष्ठ मंडळी प्रापंचिक अधिकार सोडुन निवांत जीवन जगत आहेत,इतरांना आनंदी करण्यात धन्यता मानित आहेत..हे माझ्यासाठी खुपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे मला असे वाटते की वारंवार मनन चिंतनाने चित्ताला योग्य मार्गाने नेता येणे शक्य आहे.मी या वाटेवरचा पांथस्थ आहे, शिकतो आहे. यातलं थोडंफार जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.

रामकृष्णहरी