Take a fresh look at your lifestyle.

शिरूर तालुक्यातील डिझायनरची किमया ! बनवला जगातील सर्वात उंच पाळणा.

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : आपण यात्रेत पाळणा पाहिला असेल,फोटो मध्ये दिसणारा सुद्धा एक पाळणाच आहे. पण हा साधा सुधा पाळणा नसून हा जगातला सगळ्यात मोठा पाळणा आहे, ज्याची उंची साधारणपणे 815 फूट आहे, ज्याची नुकतीच निर्मिती दुबई या ठिकाणी झालेली आहे, अभिमानाची बाब म्हणजे या पाळण्याच्या मुख्य डिझायनर टीम मध्ये शिरुर तालुक्यातील न्हावरे गावचे सुपुत्र श्री गणेश कांडगे कार्यरत होते.
गणेश कांडगे हे यूरोपातील नेदरलँड येथील कंपनीमध्ये कार्यरत आहेत,त्यांच्या कंपनीने ह्या प्रकल्पाचे डिझाइनिंगचे काम घेतले होते, ज्यांनी गेल्या 6 वर्षांपासून अनेक अडचणींचा, आव्हानांचा सामना करून हा जगातील एक आश्चर्य असणाऱ्या प्रकल्पामध्ये आपले मौल्यवान योगदान दिले, दुबई मध्ये गेल्यावर हा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा आपली छाती नक्कीच अभिमानाने फुगेल.
या 815 फूट उंचीचा पाळण्यात एकावेळी 2हजार लोकांना आरामात फिरवता येईल एवढी क्षमता आहे, 2हजार लोक म्हणजे आपल्या इकडच्या छोट्या गावांची लोकसंख्या तेवढी असते, म्हणजे एखादं छोटं संपूर्ण गाव एका वेळी फिरवता येईल,
या पाळण्यात तब्बल 48 कप्पे आहेत, हा प्रत्येक कप्पा एखाद्या बस किंवा एखाद्या खोली पेक्षा मोठा आहे, ज्यामध्ये प्रत्येकी 40 लोक आरामात बसू शकतात किंवा आतमध्ये फिरू पण शकतात.
पाळण्याचे काम तब्बल पाच हजार ते सहा हजार कामगार 6 वर्ष अहोरात्र काम करत होते,यासाठी अंदाजे 2000 कोटी एवढा खर्च आलेला आहे, या पाळण्यात बसल्यावर बरेच वेळा ढगांच्या वर असल्याची अनुभूती येते, हा पाळणा तयार करताना जगातील 10 देश एकत्र आलेले होते, हा एक जागतिक अभियांत्रिकी क्षेत्रातील वेगळा प्रयोग होता, यासाठी जगातल्या सर्वात शक्तिशाली क्रेनचा वापर केला गेला.