Take a fresh look at your lifestyle.

आ.निलेश लंके यांच्या ऐतिहासिक ‘विजया’चा दुसरा वर्धापन दिन!

'असा' झाला विधानभवनापर्यंतचा प्रवास !

 

✒️ नाना करंजुले
पारनेर : 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुका झाल्या. आणि 24 ऑक्टोबरला मत मोजणी झाली. दोन वर्षांपूर्वी विधानसभेचा रणसंग्राम पहावयास मिळाला. अनेक धक्कादायक निकाल त्यावेळी महाराष्ट्राने अनुभवले,  युवक आमदार झाले. त्यामुळे या विधानसभेमध्ये नवे चेहरे दिसू लागले. दोन वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली ती ऐतिहासिक ठरली. प्रस्थापितांना धक्का देत युवा आमदारांनी विधानसभा गाठली त्यामध्ये आमदार निलेश लंके यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने पारनेर – नगर मध्येच नव्हे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी दिली. हा जिल्हा म्हटलं तर  येथे राजकारणाचे माहेरघर आणि राजकीय कुटुंबांचे प्राबल्य समजले जाते. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, सहकारी बँका पतसंस्था, दूध संघ कारखाने, या माध्यमातून आजही नगर जिल्ह्यात मध्ये वेगवेगळी राजकीय कुटुंब राजकारण करतात. कोणतीही संस्था नसताना त्यांनी विजयश्री खेचून आणला.

राजकारण आणि त्यातली त्यात निवडणूक म्हटले पैसे लागतो. अर्थकारणाशिवाय राजकारण करताच  येत नाही अशा प्रकारचं समिकरण निर्माण झालेले आहे. मात्र खिशात एक रुपया नसताना निलेश लंके यांच्या सारखा फकीर माणूस पारनेर – नगरचा आमदार झाला. लोकवर्गणी जमा झाली आणि त्यातूनच त्यांनी निवडणूक लढवली. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून निवडणुकीत त्यांना रसद पुरवली .मोल मजुरी करणाऱ्या भगिनींनी आपल्या भावाला फुल ना  फुलाची पाकळी म्हणून मदत केली. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या संजय गांधी निराधार योजनेतून मिळालेल्या पैशातून  सुद्धा मदत केली. मुलांनी खाऊसाठी साठवलेले पैसे लोकनेते निलेश लंके यांना दिले. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून एकवीस दिवस ते संपूर्ण मतदारसंघ फिरले. त्याच गावात झोपले घरातील उंबऱ्या पासून ते शेतातील बांधापर्यंत त्यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधला. त्यातून परिवर्तन झाले आणि आमदार निलेश लंके यांना एक प्रकारे पोषक वातावरण निर्माण झाले. तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्यासारख्या तगडया आणि मातब्बर उमेदवाराच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. ज्यांच्या नावातच विजय होता, त्यांना पराजित करणं खरोखर सोपं नव्हत. सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवाय राजकीय पार्श्वभूमी असलेल्या विजयराव औटी यांना 61 हजार मतांनी निलेश लंके आणि पराभूत करून एक प्रकारे इतिहास घडवला.

इतक्या मोठ्या फरकाने लंके निवडून येतील याचा अंदाज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाही  नव्हता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हे बोलुन सुद्धा दाखवले म्हणून निलेश लंके हे विक्रमादित्य आहेत या शब्दात त्यांनी कौतुक केले. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले दुसरे आर. आर. पाटील असा नामोल्लेख सुद्धा दस्तुरखुद्द पवारांनी केला. गेल्या दोन वर्षांमध्ये आमदार लंके यांनी अखंडित आणि अविश्रांत मेहनत केली. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा वस्तुपाठ महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला त्यांनी घालून दिला. तेआमदार झाल्यानंतर काही महिन्यातच कोरोना हे वैश्विक संकट सुरू झाले. या महामारीत घरात न बसता ते  स्वतः रस्त्यावर उतरले मतदारसंघातील नागरिकांना दिलासा दिला. त्याचबरोबर शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. स्वतः पाठीवर पंप पंप घेऊन वेळप्रसंगी ट्रॅक्टर चालून निर्जंतुकीकरण फवारणी केली. टाळेबंदी मध्ये वाटसरु त्याचबरोबर वाहन चालक आणि आडकलेले कामगार यांच्यासाठी अन्नछत्र सुरू केले. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सुपा या ठिकाणी हे अन्नदान चालले. परराज्य आणि इतर जिल्ह्यातील कामगारांना त्यांनी खऱ्या अर्थाने आश्रय दिला. त्यांना त्यांच्या मूळ गावी पोचवण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे या सर्वांशी  त्यांचे वेगळे नाते निर्माण झाले. कोरोना काळामध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांनी सुरुवातीला टाकळीढोकेश्वर याठिकाणी शरदचंद्रजी पवार आरोग्यमंदिर नावाने कोविड सेंटर सुरू केले. यावर्षी नागेश्वर मंगल कार्यालय भाळवणी येथे सुद्धा कोविड सेंटर सुरू केले. हजारो रुग्ण येथून बरे होऊन घरी गेलेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी लागणारे कोट्यावधी रुपये वाचले गेले. त्याचबरोबर एकही रुग्ण त्यांनी दगावून दिला नाही.

कोरोना काळामध्ये काम करीत असताना पारनेर -नगरच्या विकासाचा बॅकलॉग त्यांनी खर्‍या अर्थाने भरून काढला. मोठ्या प्रमाणात निधी मतदार संघात आणून विकास कामे मार्गी लावले. गेल्या दोन वर्षांमध्ये तीनशे कोटी पेक्षा जास्त निधी त्यांनी खेचून आणला. या व्यतिरिक्त महिला बचत गटांचे जाळे निर्माण केले. ऑनलाइन पोलीस भरती अकॅडमी सुरू करून अनेक तरुण-तरुणींना दिलासा दिला. स्पर्धा परीक्षा करू इच्छिणार्‍यांना त्यांनी दत्तक घेतले. पुण्यामध्ये क्लासेसची सुविधा करून दिली. निघोज येथे एक कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे बांधकाम सुरू केले. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा अनुषंगाने गेल्या दोन वर्षात त्यांनी प्रयत्न केले. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या युवकांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या.365 दिवस 24 तास जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्यासारखाच आमदार आम्हालाही हवा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया इतर जिल्ह्यातूनही  येत आहेत.
परदेशात सुद्धा आ.लंके यांनी केलेल्या कामाचा डंका वाजला आहे. त्या बद्दल त्यांना ‘द महाराष्ट्रीय ऑफ द इयर’ कडून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर वर्ल्ड बुक ऑफ लंडनने सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या कार्याचा गौरव केला.
रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांनी युवक आयकॉन पुरस्कार देऊन निलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी पारनेर नगरच्या आमदाराने पक्षाची  प्रतिमा उंचावली असे गौरवोद्गार जाहीरपणे काढले. निलेश लंके यांच्या रूपाने आम्हाला हिरा मिळाला असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तर सुप्रिया सुळे जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांनीसुद्धा वारंवार जनसामान्यांमधील या  आमदाराचे कौतुक केले.
निलेश लंके आमदार झाले असले तरी ते आजही पत्र्याच्या घरात राहतात. त्यांचा साधेपणा राजकारण आणि समाजकारणाला अधिक  भावलेला आहे. तोच पाहण्यासाठी तसेच अनुभवण्यासाठी  दस्तुरखुद्द शरदचंद्रजी पवार लंके यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या कुटुंबियांचे तोंड भरुन कौतुक केले. त्याचबरोबर सर्वांची आस्थेने चौकशी केली. पवारांचा पारनेर तालुक्यातील हंगे गावचा दौरा सर्वाधिक चर्चिला गेला. गेल्या दोन वर्षांमध्ये वीस वर्षांची प्रगल्भता आमदार निलेश लंके यांच्या दिसून आली. आज ते राज्याची स्टार आमदार म्हणून ओळखले जात आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित केले जात आहे. निलेश लंके आणि गर्दी हे समीकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दोन वर्षांच्या या आमदारकी चा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!