Take a fresh look at your lifestyle.

तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांची शासनाच्या ‘या’ समितीत निवड !

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव.

शिरूर : शासनाने ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमासाठी कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची समिती तयार केली आहे, त्यात प्रसिद्ध तमाशा कलाकार राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या व अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध केला आहे.
मुंबई येथे मंत्रालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक झाली. त्यानुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनासाठी राज्यातील विविध मान्यवरांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, ए. आर रहेमान, अजय अतुल, जब्बार पटेल, रोहिणी हट्टंगडी, नंदेश उमप यांच्यासह तमाशा अभ्यासक प्रकाश खांडगे व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांचीही या समितीत निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बोलताना मंगला बनसोडे यांनी सांगितले की, आम्ही तमासगिरांनी यापूर्वी वेळोवेळो देशभक्तीपर वगनाट्य सादर केली आहेत तसेच तमाशाचा सुरुवातीला देशभक्तीचा आविष्कार असलेले गीत, संगीत आणि संवादाचा समावेश असलेले टायटल अनेकदा सादर केले आहे. आता शासनाने विशेष जबाबदारी दिल्याने पुन्हा नव्याने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू मात्र यासाठी शासनाने लवकरात लवकर तमाशा सादरीकरणाला परवानगी द्यावी.
यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांनी मंगला बनसोडे यांचे अभिनंदन केले.