Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुक्याला ऑक्टोबर ‘हीट’चे चटके !

येणारा आठवडा 'ताप'दायक तापमान 33 अंशाच्या पार जाणार !

पारनेर : पारनेर तालुक्यात वातावरणात सातत्याने बदल होत असून आता परतीचा पाऊसही थांबला आहे. दोन-तीन दिवस बदलांमुळे तालुक्यातील नागरिकांना उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तालुक्याचे किमान तापमान 30 अंशांपेक्षा अधिक असून येणाऱ्या आठवड्यात तापमान 33 अंशाच्या पार जाण्याचा अंदाज आहे.
सध्या कधी थंडी तर कधी उन्हाचे चटके सहन करावे लागत पुन्हा वातावरणाने कूस बदलली असून किमान तापमानातही घट होत असल्यामुळे आता तालुक्याला थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान शनिवारी शहराचे कमाल तापमान 31.4 तर किमान तापमान 19.1 अंश सेल्सिअस होते. कमाल तापमानातही सातत्याने घट होत असल्यामुळे चालू आठवड्यात थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान येत्या आठवड्यामध्ये कमाल तापमानात वाढ होणार असल्यामुळे येणारा आठवडाही तालुक्यासाठी हाॅट ठरणार असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात या कालावधीत किमान तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे. ऑक्टोबर हीट आणि दिवाळीच्या जवळपास थंडी जाणवण्यास सुरुवात होते. आता ऑक्टोबर महिन्याच्या तीन आठवड्यानंतर तालुक्यात उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्याचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तर कमाल तापमान 30 अंशाच्या आसपास होते.
काही वेळा तालुक्यावर ढगांची चादर असली तरी रात्रीचे कमाल तापमान वाढण्यास सुरुवात झाल्याने उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पावसानंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमान कमी होण्यास सुरुवात होते. याच कालावधीत दिवसभर उन्हाचा कहर तर पहाटे व सूर्यास्तानंतर थंड वारे वाहण्यास सुरुवात होते. सध्या याच प्रकारचे वातावरण तालुकाभर तयार होत असून या आठवड्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवण्यास सुरवात होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.