Take a fresh look at your lifestyle.

करूणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंनी केले ‘हे’ ट्वीट !

म्हणे,परळी सुन्न आहे,राज्याची मान खाली गेली आहे.

 

बीड: माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या नव्या ट्वीटमुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. ‘परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,’ असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे. करुणा शर्मा यांच्यावरील पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या ट्वीटचा रोख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी उघडलेल्या आघाडीमुळे सध्या बीडचे राजकीय वातावरण तापलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे असून ते पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले होते. हे पुरावे जाहीर करण्यासाठी करुणा शर्मा परळीत आल्या असता काही महिलांनी त्यांना घेराव घातला व धनंजय मुंडे यांच्या बदनामीबाबत जाब विचारला.

त्यावेळी शाब्दिक चकमक झाली. करुणा शर्मा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप दोन महिलांनी केला. त्यावरून पोलिसांनी करुणा शर्मा यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांच्या गाडीत पिस्तूल मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे. ‘चुकीचे लोक शक्तिशाली असल्यामुळेच अन्याय होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणूनही अन्याय होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणीही आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. चुकीचा पायंडा पडू नये, ही काळाची गरज आहे,’ असेही पंकजा यांनी म्हटले आहे. ‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे,’ असे पंकजा यांनी पुढे म्हटले आहे.

▪️कोण आहेत करुणा शर्मा?

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या फसवणुकीच्या व बलात्काराच्या आरोपांनंतर करुणा शर्मा हे नाव प्रथमच समोर आले होते. करुणा आणि रेणू शर्मा या दोघी बहिणी आहेत. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुलं आहेत. खुद्द मुंडे यांनीच काही दिवसांपूर्वी ही कबुली दिली होती. मात्र, रेणू शर्मा यांनी केलेले बलात्काराचे आरोप त्यांनी खोडून काढले होते. रेणू शर्मा यांच्याबद्दल इतर नेत्यांच्याही तक्रारी आल्या होत्या.

त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं.