Take a fresh look at your lifestyle.

जवळ्यातील ‘त्या’ पिडितेच्या आरोपींना अटक करण्याचे निर्देश !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पोलिस प्रशासनाला सूचना.

अहमदनगर- पैठण येथील सामूहिक बलात्कार घटनेतील आणि पारनेर तालुक्यातील जवळे येथील घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी उचित उपयोजना करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी औरंगाबाद आणि नगर पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री पैठण तालुक्यातील तोंडळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला केला. त्यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद् उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपअधीक्षक विशाल नेहुल यांच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती घेतली. तसेच याघटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी पथक तयार करावे. त्याचप्रमाणे याच परिसराच्या जवळच्या जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी अशाच घटना घडल्या होत्या.दि. १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याची देखील माहिती घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच महिलांचे व त्या कुटुंबाचे समुपदेशन तात्काळ करावे अशी देखील सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली आहे.
तसेच या घटनेतील आरोपी पूर्वीच्या घटनेतील संबंधित आहेत का ? किंवा पूर्वीच्या कोणत्या घटनेतील आरोपी या घटनेत आहेत का? याचा देखील तपास करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांना केली आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासन योग्य ती पावले उचलत असल्याचे नेहूल यांनी सांगितले. तसेच लवकरच आरोपीना अटक करण्यात येईल देखील त्यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील जवळा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याबाबत देखील डॉ. गोऱ्हे यांनी नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दूरध्वनी वरून संपर्क करून आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.