Take a fresh look at your lifestyle.

अजितदादांच्या उपस्थितीत वाजली ‘तिसरी घंटा’ !

राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्याची ग्वाही !

पुणे: रसिक प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते असे पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर शुक्रवारी पुन्हा एकदा रसिकांच्या सेवेसाठी सुरू झाले.बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील,त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करेल.कोरोनानं सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील कलाकारांचं झालेलं नुकसान लक्षात घेता त्यांस आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळानं घेतला.
कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. १९ महिने नाट्यगृह बंद राहिल्यानं कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास नाट्यगृहात १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात येईल.
एकल कलावंतांना ५ हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्यानं सोडवण्यात येतील. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीनं पुढे नेण्याचं प्रयत्न शासन करीत आहे.
राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणं आवश्यक असल्यानं त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.