Take a fresh look at your lifestyle.

…पण तरीही महागणपतीचे ऑनलाईन दर्शन सुरु !

पोलिस बंदोबस्तात द्वारयात्रेला प्रारंभ.

 

शिरूर : रांजणगाव गणपती भाद्रपद गणेशोत्सवाला आजपासून उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेला परवानगी नाकारली असली तरी द्वारयात्रेला मात्र काही अटींवर परवानगी दिली आहे.

पोलीस बंदोबस्तात आज मोजक्या ट्रस्टी मंडळींच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या वाहनातून द्वारयात्रेला प्रारंभ झाला.आजपासून चार दिवस करडे, ढोकसांगवी, निमगाव म्हाळुंगी व गणेगांव खालसा याठिकाणी शासकीय नियमानुसार द्वारयात्रेचा कार्यक्रम पार पडणार आहे.

यात्रेदरम्यान गणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी ऑनलाईन दर्शन मात्र सुरु राहणार आहे. भाद्रपद गणेशोत्सवानिमित्ताने संपूर्ण महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर विविधरंगी विद्युत दिव्यांनी सुशोभित करण्यात आला आहे.

रांजणगाव गणपती येथे प्रतिवर्षाप्रमाणे आज पासून ते शुक्रवार पर्यंत  या कालावधीत होणारा भाद्रपद गणेशोत्सव ‘श्रीं’ ची मुक्तव्दार यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे या कालावधीत हाताने स्पर्श करून महागणपतीचे मुक्तव्दार दर्शन व देवाला जलाभिषेक बंद असणार आहे. तसेच पालखी सोहळाही रद्द करण्यात आलेला आहे.

या काळात होणारे भाविकांची दंडवते, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. मात्र दैनंदिन पूजाअर्चा, अभिषेक प्रमुख पुजारी मंडळीच्या उपस्थितीत पार पडणार आहे.