Take a fresh look at your lifestyle.

दुष्ट विचार शरीर पोखरते !

निरोगी जीवनासाठी विचार शुद्धीकरण महत्त्वाचे आहे.

दिवसभर आपण काय करतो?हा काय प्रश्न झाला का?काही तरी कामधंदा करावाच लागतो.त्याशिवाय प्रपंच चालेल का?अगदी खरं आहे.पण तरीही आपण दिवसभर काय करतो हा प्रश्न आपणच आपल्याला फार कमी वेळा विचारतो.बहुदा विचारावसच वाटत नाही.आपण जे करतो ते बरोबरच आहे अशा थाटात सगळं चाललेलं असतं.अर्थात अनेकांच्या बाबतीत हे खरंही असेल.
तरीही हे चिंतन आपणास काहीतरी देऊन जाईलच.आपण सतत जास्त विचार कशाचा करतो?आपणच आपल्याला हा प्रश्न विचारला तर बरचसं सत्य आपलंच आपल्या समोर येईल.प्राधान्य क्रमानं विचार जुळवण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे. सर्वात जास्त प्रमाणात कोणत्या गोष्टींचा विचार सतत करत असतो?मग कुणाला उद्योग धंद्याविषयी चिंता असेल,नोकरी विषयी,कौटुंबिक समस्या,आर्थिक समस्या या सगळ्यावर कसा मार्ग काढावा यावर आपण विचार करत असु तर आपण विनाशकारी विकारांच्या कक्षेत येत नाही.आणि त्यामुळे आपली मनुष्यत्वाची वाट बिघडत नाही.
आपण कसे आहोत हे व्यक्त होणाऱ्या विकारांवरुनच कळते.आपल्या डोक्यात सतत दुसऱ्यांविषयी तुच्छ, तिरस्कार भाव निर्माण होऊन तसा विनाशकारी विचार डोक्यात घोळत असेल तर आपण मनुष्यत्वाची वाट सोडून भरकटण्याची शक्यता जास्तच असेल.कारण आपली दैनंदिन कर्म त्या विकारी विचारांनी होत रहातात.दुसऱ्याच्या विनाशाची चिंतनं मनुष्याला कधीच आनंदी जगु देत नाहीत. शिवाय दुष्ट विचारांनी शरीरात पाझरणारी विषारी द्रव्ये शरीर पोखरत असतात हे तर आम्हाला मान्यच नसेल.विकार घेऊन जगण्याची सवय झाली की मग स्वभावही तसा बनतो.अशा तापदायक वृत्तीच्या व्यक्तीपासून सज्जन माणसं चार हात दुरच रहातात.
सज्जनहो आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी विचार शुद्धीकरण प्रक्रिया करत राहिले पाहिजे. बरेचसे शारीरिक मानसिक आजार केवळ दुष्ट,विनाशक विचारांची जोपासना केल्याने होतात.प्रत्यक्ष खाण्यात येणारे आम्लारी पदार्थ काही धातुंच्या भांड्यात राहिले तर त्याला भोकं पडतात.तसं वाईट विचारांपासून शरीरात तयार होणारं आम्ल हे शरीर नावाच्या भांड्याला भोकं पाडतं.ते आजारी पडणं,व्याधीग्रस्त होणं म्हणजे भोकं पडण्याचीच प्रक्रिया आहे.
तुकोबाराय पापवृत्तीने जगणाऱ्यास म्हणतात, मना आला तैसा करिती विचार।म्हणती संसार नाही पुन्हा।।तुका म्हणे पाठी उडती यमदंड।पापपुण्य ते न विचारीती।। अविचाराने यमयातना भोगाव्या लागतातच.आपण सतत शुद्ध विचारधारेतच रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
रामकृष्णहरी