Take a fresh look at your lifestyle.

शिरूर तालुक्यातील “या” बँकेवर भरदिवसा पडला दरोडा !

कोट्यावधींचे सोने आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लांबवली.

शिरुर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर भरदिवसा दरोडा टाकून दोन कोटी 31 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लांबवली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे दुपारच्या सुमारास व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहक देखील उपस्थित होते. अचानक दिड वाजण्याच्या दरम्यान सफेद कलरच्या सियाज कारमधुन आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले.
एक जण दरवाजा मध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले . त्यांनी व्यवस्थापक व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन सफेद रंगाच्या कार गाडी मधून पलायन केले. या गाडीवर ‘प्रेस’ चा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.
पिंपरखेड पासुन शिरूर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले.पुणे व नगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यांची सुचना देण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान भरदिवसा पडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
गाडीमध्ये दरोड्यासाठी आलेले दरोडेखोर हे संख्येने पाच ते सहा इसम होते. ते पंचवीस ते तीस वयोगटातील आहेत. त्यांनी निळ्या जीन्स पँट व तपकिरी आणि ग्रे कलरची जर्किन घातलेले असून कानटोप्या घातलेल्या आहेत. पायामध्ये बूट आहेत. त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.