Take a fresh look at your lifestyle.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 25 तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम !

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा.

 

मुंबई :कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ती ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी ही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी.
महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन – ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी त्यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
इंजिनिअरिंग साठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेमध्ये पहिल्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांपैकी जे गुणवंत विद्यार्थी मुंबईच्या व्हीजेटीआय संस्थेत प्रवेश घेतील, त्या विद्यार्थ्यांना संपूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाईल, असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाहीर केले आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दीड वर्ष बंद असलेली महाविद्यालयांची दारं कालपासून पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. मुंबई, पुण्यात मात्र अनेक महाविद्यालयं प्रत्यक्ष बंदच होती. मुंबईतील बहुतांश कॉलेज नियोजन न झाल्याने पदवी अभ्यासक्रमाचे ऑफलाइन वर्ग सुरू करणार नाहीत.