Take a fresh look at your lifestyle.

बुद्धीवंताचाही इच्छेने विनाश होतो !

इच्छेमुळे जीवन पुर्णत्वास जात नाही.

इच्छा हेच जगण्याचं कारण आहे. इच्छा संपल्यावर जगण्यात काय अर्थ आहे, असं सर्वांनाच वाटत असावं.पण हे फारसं खरं नाही. निरच्छित जीवन जगणं म्हणजे खरा जगण्याचा आनंद घेणे आहे. हे सर्व संतांनी वारंवार जरी सांगितले असले तरी त्या अवस्थेत कुटुंब कबिला असणारा जाणं अगदी दुरापास्त आहे. पण इच्छेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. ती स्वैर झाली तर स्वैराचार होतोच.आपण दैनंदिन बुद्धिवंतांच्या अधःपतनाच्या बातम्या वाचतो,पहातो.अगदी सरकारी कारकुनापासुन ते आय.ए.एस.अधिकाऱ्यांपर्यंत लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेले पहातो.सरकारी नोकरीला ‘सेवा’ ‘हा शब्द. जोडलेला आहे.

सेवा करायचीच नाही हे ठरवून बुद्धिमान व्यक्ती अधिकारी होण्यासाठी बुद्धिचा वापर करील,तर धन खोऱ्यानं जमा करण्याची इच्छा राक्षस झालेली असते.ते भ्रष्ट आचरण कुटुंब स्विकारते.कारण सर्व सुखसोई त्यामुळे उपलब्ध होतात.समाजव्यवस्थेतील इतर घटक अशी इच्छा ठेवीत नाहीत का?सगळीकडे हेच चालू आहे.
पण कोळशाच्या दुकानात नोकरी करणारानं कोळशाची चोरी करुन काय मिळणार?हात काळे होणार हे निश्चित पण तरीही इच्छा सर्व करुन घेतेच.सज्जनहो पवित्र इच्छा ठेवून जीवन जगणारे सज्जन सुद्धा या समाजव्यवस्थेत आहेत.याची प्रचिती सुद्धा आपण वारंवार घेत असतो.आता मागे एक बातमी वाचण्यात आली,एका रिक्षा चालकाने प्रवाशाचे रिक्षात विसरलेले पाच लाखांचे दागिने परत केले.रिक्षा चालवून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करणारा किती कमावत असेल?काय शिल्लक रहात असेल?आर्थिक ताण त्याच्या पाचवीला पुजलेला असेल! पण तरीही त्याला ते दागिने ठेवण्याची इच्छा न होणं असामान्य आहे. तो जगत असलेलं सचितानंद जीवन भ्रष्टाचारानं कमवून धनात लोळणाराला कसं प्राप्त होईल?

तुकोबाराय म्हणतात, इंद्रियें दमिली इच्छा जिती जीवी।नागविती ठावीं नाहीं पुढें।।
इच्छेने इंद्रिये कर्म करतात.पण कितीही पाठपुरावा केला तरी इच्छेला पुर्णविराम नाही.त्यामुळे अधःपतनाच्या गोष्टी घडत रहातात.इच्छेने भोग निर्माण होतात.दुःख वाट्याला येतं.वाल्या कोळ्यानं आपल्या बायका मुलांना विचारलं,की माझ्या पापात वाटेकरी होणार का?पापभोग भोगायला कुणीही तयार झालं नाही. त्याला बोध झाल्याने त्याचा वाल्मिक ऋषी झाला.माझ्या डोळ्यासमोरचं एक उदाहरण आहे. एका व्यक्तीने वयाच्या सत्तरी पर्यंत आपल्या चारही मुलांसाठी जवळपास स्थावर तेरा एकर बागायती आणि बँकेत एक कोटी रुपयांची पुंजी अशी प्रॉपर्टी करुन ठेवली.पुढे वयपरत्वे ते आजारी पडले.वरवरचे उपचार झाले.पण खर्चाची बाजु चालु झाल्यावर त्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.आणि उपचारा अभावि त्यांचं निधन झालं.हेच जीवनाचं सत्य आहे.
महाराज म्हणतात,नाही तरी जया तैसा।भोग भोगविल इच्छा।।
इच्छा हेच सर्व भोगांचं कारण आहे. आपल्या इच्छा पवित्र ठेवणे हे आपल्या हातात आहे. भगवतनामाची इच्छा सदोदित ठेवावी.त्यायोगे बुद्धी सदिच्छा निर्माण करील.बुद्धिचा ऱ्हास होण्यापासुन वाचवणारं फक्त हरीनाम आहे.तोच एक सुसंस्काराचा धागा आता शिल्लक आहे.आपल्या इच्छा प्रबळ झाल्याने कमाईचे श्रोत कमी पडताहेत.त्यामुळे अतिरिक्त कमाईचा श्रोत शोधण्याची गरज भासत आहे. ते अपरिहार्य आहे. पण इच्छा पवित्र करण्यासाठी प्रयत्न करणही तितकच गरजेचं आहे.
रामकृष्णहरी