Take a fresh look at your lifestyle.

रूपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड !

मुंबई : राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचे पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळाले. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत. तशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हा पासून हे पद रिक्तच होते. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी भाजप आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जात होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्य सरकारवर अनेकदा टीकास्त्र डागले आहे. अशावेळी अखेर ठाकरे सरकारने रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली आहे.