Take a fresh look at your lifestyle.

बैलांच्या पाठीवर रंगली नारायण राणे, उद्धव ठाकरेंची जुगलबंदी !

बैलपोळ्याच्या सणावरही उमटले राजकीय पडसाद !

शिरूर : ग्रामीण भागात यंदा बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सध्याचे राजकीय पडसाद यंदाच्या बैलपोळ्यावर उमटलेले पहावयास मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीवर व्यंगचित्र आणि चपखल घोषवाक्य रंगवत लक्षवेधी परिणाम साधला. येथील पंचक्रोशीत या अफलातून प्रयोगाला पसंतीची मोहोर उमटली आहे.

बैलांच्या अंगावर काही उत्साही राजकीय शेतकऱ्यांनी कुंचल्यातून माजी कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे तैलचित्र रंगवत ‘८० वर्षाचा तरुण’ तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुगलबंदी व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या तैलचित्रासह ‘बांधावरील कृषिमंत्री’ अशी बिरुदावली बहाल करत अभिवादन केले होते .अनेक ठिकाणी तर आपल्या पक्षाचे चिन्ह आणि ध्येय धोरणे मोजक्या शब्दात बैलांच्या अंगावर रेखाकृती करून परिणाम साधला होता.

काही ठिकाणी राजकीय विरोधकांना बैलाच्या माध्यमातून खोचक टोमणे मारण्यात आले होते. काही ठिकाणी आकस्मित निधन पावलेल्या मित्रांना बैलांच्या माध्यमातून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. तर काही ठिकाणी डब्ल्यू एच ओ सारख्या संघटनांचे लोगो पहावयास मिळाले. काहींनी तर चक्क कोरोनाच्या विषाणूचेच चित्र बैलाच्या अंगावर रेखाटले होते हे सर्व पहाणार्‍या लोकांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत होते.

काही गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियमांचे पालन करून तर काही गावांमध्ये ‘कोरोना बिरोना सब कुछ खत्म हुआ’ अशा अविर्भावात कोरोनाच्या नियमांना फाट्यावर मारून धुमधडाक्यात बैलांच्या मिरवणूका निघाल्या होत्या.अनेक गावांमध्ये काही समजूतदार व जबाबदार लोकांनी मात्र बैलजोडीची गावात मिरवणूक टाळून घरीच बैलांचे औक्षण केले.