Take a fresh look at your lifestyle.

राधाकृष्ण विखेंचा स्वप्नभंग झाल्यानेच ते बेताल वक्तव्ये करतात !

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची टीका.

ठाणे : आघाडी सरकार पाडून शपथविधीची स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचा भंग झाल्याने त्यांच्याकडून ऊठसूट बेताल वक्तव्ये केली जात आहेत, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्यावर केली केली. ते ठाण्यात काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना थोरात बोलत होते.सरकार कसे कमकुवत होईल, कसे पाडता येईल यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

महसूलमंत्री थोरात म्हणाले की,ईडी, सीआयडी या यंत्रणा पूर्वी माहितीही नव्हत्या. आता लहान मुलांनाही ईडी समजायला लागली आहे. या यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरील असून, विघातक प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी असाव्यात; मात्र, त्या आता राजकारणासाठी वापरल्या जात आहेत. सरकार कसे कमकुवत होईल, कसे पाडता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या या संस्थांनी कितीही प्रयत्न केला तरी आमचे सरकार भक्कम आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे; परंतु अशा नेत्यांची आता कीव येत आहे. शपथविधीचे स्वप्न पाहत होते. नवीन कपडेही शिवत होते. आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल असे वाटत होते, परंतु तसे होत नसल्याने नैराश्य आल्याने अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत. कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी कोरोना संपलेला नाही; परंतु हिवाळी अधिवेशन नागपुरला होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

▪️इंधन दरवाढीवर केंद्राचे दुर्लक्ष.
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही. काँग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधनवाढ झाली तरी भाजपवाले आंदोलन करायचे. मात्र, ते आता लपून बसले आहेत का? असा सवाल थोरात यांनी विचारला. आता वाढलेले दर केंद्राने कमी करावेत. यात राज्य सरकारची जबाबदारी कमी आहे. ५० हजार कोटींची जीएसटी अद्याप केंद्राने दिली नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागत असल्याचेही थोरात यांनी सांगितले.