Take a fresh look at your lifestyle.

लोकनेत्याचा ‘जीवनपट’ चित्रपटातून साकारणार !

आ.निलेश लंके यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार.

 

✒️ नाना करंजुले
पारनेर : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पारनेर – नगरचे आमदार निलेश लंके यांचे नाव गाजत आहे. राजकारणाची प्रतिमा उजळणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशा या लोकनेत्याचा जीवनपट चित्रपटातून उलगडणार आहे. याबाबत कथा लेखन तयार झाले आहे. त्याचे पूजन रविवारी 24 ऑक्टोबर रोजी श्री संत निळोबारायांच्या पावन भूमीत म्हणजेच पिंपळनेर या ठिकाणी करण्यात येणार आहेत. लवकरच चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आ.लंके यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याच्या शोध सध्या सुरू आहे. हिंदी आणि मराठी मध्ये हा चित्रपट असणार असून एकाच वेळी एक हजार ठिकाणी त्याचे प्रदर्शन करण्याचे नियोजन आहे.
आमदार निलेश लंके हे सामान्यातील असामान्य असे नेतृत्व आहे. जनसामान्यांमध्ये वावरणारे, त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस काम करणारे आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे साधे राहणीमान हे राजकारण आणि समाजकारणाला भावले आहे. कोरोना वैश्विक संकटामध्ये स्वतःला झोकून देत त्यांनी हजारो रुग्णांचा जीव वाचवला. शरदचंद्रजी पवार आरोग्यमंत्री नावाने सलग दोन वर्ष कोविड सेंटर सुरू केले. एकही रुग्ण दगावून दिला नाही. टाळेबंदी मध्ये अन्नछत्र चालू करून चार लाख नागरिकांना अन्न दिले. त्याचबरोबर एक कोटी रुपये खर्च करून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू दिल्या.
मतदार संघातील स्पर्धा परीक्षा करू इच्छिणार्‍यांना त्यांनी दत्तक घेतले. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अखंडित पाठपुरावा केला. अपंगांचे जीवन सोपस्कार व्हावे यासाठी प्रयत्न केले. सर्वसामान्यांशी थेट संवाद असणारे या नेतृत्वाची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या आमदार निलेश लंके यांचा राजकीय प्रवास खडतर आहे. त्यांना अनेक अडथळयांच्या शर्यती पार कराव्या लागल्या. विरोधकांचा पराकोटीचा विरोध मोडीत काढत त्यांनी जनसामान्यांच्या पाठबळावर यशाचे शिखर गाठले.
लोकप्रतिनिधी कसा असावा याचा वस्तुपाठ महाराष्ट्राच्या राजकारणात समोर ठेवला. जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांचे काम सुरू आहे. कोरोना काळातही आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला. या सर्व गोष्टी असताना त्यांचे बालपण कसे गेले. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली. त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या त्यांच्या कुटुंबीयांनी कसा पाठिंबा दिला. त्याचबरोबर संघटन करून राजकारणात आपला दबदबा कसा निर्माण केला. त्यासाठी कोणत्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले या व इतर अनेक गोष्टींचा उलगडा करणारा त्यांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. याकरता नऊशे पानांची पटकथा तयार करण्यात आली आहे. त्याचे पूजन रविवारी विधिवत करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित या अगोदरच चित्रपट आलेला आहे. त्यानंतर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट सुद्धा चित्रपटांमध्ये साकारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सुद्धा यांचा जीवनाचा आलेख चित्रित करण्यात आलेला आहे. या दिग्गज नेत्यांना बरोबरच पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांचा जीवनपट कलानिर्मितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेबरोबरच हिंदी भाषिकांना सुद्धा उलगडणार आहे.