नगर : राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे यांनी नुकतीच आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. त्यानी संपूर्ण विकास कामांची पाहणी करून पद्मश्री पोपटराव पवार यांनी सविस्तर माहिती दिली. संपूर्ण शिवारफेरी करताना केलेले काम व झालेला परिणाम याचे कौतुक श्री. गावडे यांनी केले. पाहणीनंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, पद्मश्री पोपटराव पवारांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हिवरे बाजार हे गाव आदर्श बनविले आहे. आदर्श गावास आवश्यक गोष्टी या ठिकाणी प्रकर्षाने पहावयास मिळाल्या असून अतिशय सुंदर काम केले आहे. त्यात विशेष करून जलसंधारण, मृद्संधारण पाण्याचे व पिकाचे नियोजन दिशादर्शक आहे.
संपूर्ण देशभर कोविड -१९ या भयंकर आजाराने थैमान घातले असून हिवरे बाजार या गावातील नियोजन अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच हिवरे बाजार हे गाव पहिले कोरोनामुक्त गाव ठरले असून त्या गावातील शाळा ऑफलाईन पद्धतीने १५ जून पासून नियमितपणे सुरु आहेत. एके दुष्काळाशी सामना करण हे गाव आज स्वयंपूर्ण झाले आहे हि वाटचाल अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये केली आहे.
राज्यस्तरावर धोरणे ठरविताना अनेक वेळा पोपटराव पवार यांचे बरोबर हिवरे बाजार विषयी चर्चा झाली परंतु आजच्या भेटीने अनेक गोष्टी समजल्या भविष्यकाळात धोरणे ठरविताना हिवरे बाजार भेटीचा निश्चित फायदा होईल.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श गाव योजनेअंतर्गत हिवरे बाजार येथे सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. त्यात श्री. गावडे यांनी सांगितले लवकरच इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे जेणेकरून नवीन इमारतीत प्रशिक्षणे सुरु करण्यात येतील.
सदर बैठकीस कृषी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे उपसंचालक सुरेश भालेकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, वास्तुविशारद माधव हुंडेकरी यांनी संपूर्ण इमारतीच्या कामकाजाची माहिती दिली. समवेत आदर्श गाव योजनेचे तंत्र अधिकारी गणेश तांबे,तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले,सा. बां. विभागाचे किशोर डोंगरे अहमदनगर हे उपस्थित होते.