Take a fresh look at your lifestyle.

वाचनाने सकारात्मक विचारशैली आत्मसाद करता येते : डॉ. माया लहारे

पारनेर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.

 

पारनेर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील पारनेर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब शेळके, डॉ. माया लहारे, ग्रंथालयीन स्टाफ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हजर होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने प्रा. डॉ. माया लहारे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला.
महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. माया लहारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या वाचनाची सवय ही अचानक लागत नाही तर ती लावून घ्यावी लागते जसे लहान मुल हळूहळू चालायला शिकतं त्याप्रमाणे वाचनाची सवय हळूहळू लावून घ्यावी लागते. वाचनाची क्रिया सहज व्हायला हवे दडपण घेऊन जर कुठलं वाचन केलं तर त्यातून ज्ञान तर मिळेल पण वाचनाचा आनंद मिळणार नाही.
अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तकांचं वाचन केलं तर ती परीक्षेत सुयश प्राप्त करून देतात आणि अवांतर वाचन हे जगाच्या पाठीवर वावरताना ज्या स्पर्धा परीक्षांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये सुयश प्राप्त करून देतात. आपल्याला नेमकं काय वाचायला आवडतं हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. जे साहित्य आपल्याला वाचायला आवडतं ते वाचावं. त्यातून आपलं वाचन कौशल्य विकसित होत. वाचनाची बैठक तयार होते. इतर साहित्य वाचनाकडे आपण आकर्षिले जातो असेही लहारे म्हणाल्या.
या निमित्ताने त्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र बाबत माहिती दिली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एका साध्या नावाड्याच्या घरामध्ये जन्मले. रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन हा त्यांचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. या प्रवासात त्यांना अनेक व्यक्ती भेटल्या. ते अग्निपंख या आपल्या आत्मचरित्रात असे म्हणतात की, कुटुंबाकडून तर मला संस्कार मिळाले ते माझ्या भावंडानाही नाही मिळाले. परंतु, जलालुद्दीन आणि शमसुद्दीन या दोन व्यक्ती ज्या मला माझ्या लहानपणी मिळाला भेटल्या त्यांच्यामुळे मी जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला शिकलो नव्या जगाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता या दोन व्यक्ती मुळेच माझ्या मनामध्ये निर्माण झाली. माझी वाचनाची आवड जोपासणारे तिसरी व्यक्ती म्हणजे एस टी आर माणिकम त्यांनी लहानपणापासून मी वाचावं यासाठी सतत मला प्रेरित केलं. त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा संग्रह त्यांनी मला वापरायला दिला आणि सतत मी वाचन करत राहावं यासाठी उत्तेजन देत गेले. या तीनही व्यक्तीमुळे माझं वाचन वाढत गेल. वाचन एक छंद म्हणून जोपासण्या ऐवजी तिच्याकडे गरज म्हणून पाहिलं पाहिजे.
वाचनामध्ये अनेक गुण आहेत. ते आम्हाला बाह्य जगाशी जोडलेलं ठेवतात. ते अग्निपंख मध्येच असं सांगतात की, ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांना इंग्रजी साहित्य वाचण्याची गोडी लागली. त्यानी तत्कालीन क्लासिकल म्हणावं असं सर्व साहित्य वाचून काढलं. टॉलस्टॉय, स्कॉट हे त्यांचे आवडते लेखक. त्यानंतर तत्वज्ञान विषयक पुस्तके वाचण्याची गोडी त्यांना लागलेली आहे. त्यांनी आपले सतत वाचन करणं कधीही बंद केले नाही. अगदी शेवटच्या वर्षात प्रोजेक्ट करत असताना देखील त्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला आणि प्रथम क्रमांकाचा बक्षीसही मिळवल. ते असं म्हणतात कि, नवीन कल्पना सुचण्यासाठी देखील वाचन हे करायलाच हव.
विद्यार्थी आणि ग्रंथालय याबद्दल बोलताना डॉ. लहारे म्हणाल्या की, शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात तेवढ्या प्रमाणात नंतर ती उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या काळात ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. ग्रंथालय हे पुस्तकांचे भांडार आणि पुस्तक ही ज्ञानाचे भांडार आहेत. ग्रंथालयामध्ये विविध विषयांचे विविध प्रकारचे ग्रंथ एकाच वेळी आपल्याला उपलब्ध होतात. तेवढ्या प्रमाणात नंतर आपण उपलब्ध करून घेऊ शकू की नाही हे ठाऊक नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्येच ग्रंथालयाचा जेवढा वापर करून घेता येईल तेवढा करावा.जेवढे वाचन शक्य आहे तेवढे करावे. वाचनाने सकारात्मक विचारशैली आत्मसात करता येते असे त्यांनी सांगितले. शेवटी ज्योती पतके यांनी सर्वांचे आभार मानले.